अतिसारावर मात करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात १६ जूनपासून 'स्टॉप डायरीया कॅम्पेन' ५ वर्षांखालील बालकांच्या आरोग्यासाठी व्यापक मोहीम

 



 

            ठाणे दि.15(जिमाका) :- पाच वर्षांखालील बालकांमधील अतिसारामुळे होणारे आजारपण आणि मृत्यूचे प्रमाण पूर्णपणे रोखण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात 'स्टॉप डायरीया कॅम्पेन २०२६' हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या मोहिमेची पूर्वतयारी १ जून २०२६ पासूनच जिल्हाभरात सुरू झाली असून, या अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी १६ जून ते ३१ जुलै २०२६ या दीड महिन्याच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे केली जाणार आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत बालकांमध्ये अतिसाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.

            हे अभियान जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली राबवले जात आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या थेट समन्वय, नियोजन आणि प्रभावी पर्यवेक्षणाखाली आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. 'अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेऊनी साथ' हे या अभियानाचे मुख्य घोषवाक्य असून, बालकांना वेळेत उपचार मिळवून देणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी व्यापक जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.

            अभियानाची यशस्विता घराघरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात गृहभेटी दिल्या जाणार आहेत. या भेटींदरम्यान पाच वर्षांखालील बालकांच्या पालकांना अतिसार प्रतिबंध आणि त्याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत मोफत ओआरएस पाकिटे आणि झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असून, ओआरएसचे द्रावण योग्य पद्धतीने कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिकही पालकांना दाखवले जाईल. यासोबतच, आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी हात धुण्याच्या योग्य पद्धतींचे प्रबोधन केले जाईल आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाईल. ज्या बालकांना तातडीच्या उपचारांची गरज आहे, त्यांना तात्काळ वैद्यकीय सेवा आणि आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

            या मोहिमेत पालकांसाठी "जुलाब झाला तर ORS आणि Zinc दोन्ही आवश्यक" हा अत्यंत महत्त्वपूर्ण आरोग्य संदेश दिला जात आहे. अतिसार झालेल्या बालकाला सुरुवातीलाच ओआरएस द्रावण पाजणे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार सलग १४ दिवस झिंकचा उपचार पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. झिंकच्या गोळ्यांमुळे अतिसाराची तीव्रता आणि त्याचा कालावधी तर कमी होतोच, शिवाय पुढील काही महिन्यांपर्यंत बालकाला पुन्हा जुलाब होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या घटते. इतकेच नव्हे तर, या उपचारामुळे आजारपणानंतर बालकाची भूक सुधारून त्याचे वजन वाढण्यासही मोठी मदत होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी आणि विशेषतः पालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी केले आहे.

00000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न