ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकात्मिक फलोत्पादन विकास व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अर्जांचे आवाहन

 



ठाणे,दि.16(जिमाका) :- ठाणे जिल्ह्यात सन 2026-27 या आर्थिक वर्षात 'एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान' आणि 'राष्ट्रीय कृषी विकास योजना' राबविण्यात येणार आहे. या दोन्ही योजनांमधील विविध घटक आणि उपघटकांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे, शेतीचा विस्तार करणे आणि काढणीपश्चात तंत्रज्ञानाला चालना देणे हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत शेती व्यवसायाला आधुनिक रूप देण्यासाठी विविध बाबींवर अर्थसाहाय्य व अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.

योजनांचे स्वरूप आणि समाविष्ट घटक:

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान: या योजनेअंतर्गत क्षेत्र विस्तार कार्यक्रमात मिरची लागवड, काळीमिरी, फळबाग लागवड आणि सुटी फुले लागवड या घटकांचा समावेश आहे. तसेच अळिंबी (मशरूम) प्रकल्प, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आणि औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

याशिवाय, आधुनिक व नियंत्रित शेतीसाठी हरितगृह (ग्रीनहाऊस), शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, तण नियंत्रण, फळ पिकांकरिता फळांना किंवा फळांच्या घडांना कव्हर करणे आणि कुंपण घालणे या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन यांत्रिकीकरण यासह फार्म गेट पॅक हाऊस, राईपनिंग चेंबर, शीतगृह (कोल्ड स्टोरेज), नियंत्रित वातावरणातील साठवणूक गृह आणि सोलर क्रॉप ड्रायर यांसारख्या काढणीपश्चात (Post-Harvest) सुविधा, मूल्यवर्धन, प्रक्रिया व पणन (मार्केटिंग) सुविधा स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. संशोधन आणि विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनाही याद्वारे साहाय्य केले जाईल.

राष्ट्रीय कृषी विकास योजना: या योजनेअंतर्गत प्रामुख्याने शेततळे अस्तरीकरण आणि कांदाचाळ उभारणी या महत्त्वाच्या बाबींसाठी शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत:

या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या 'आपले सरकार ई-सेवा केंद्रात' जाऊन, महाडीबीटी (MahaDBT) च्या https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे 'फलोत्पादन' या घटकाची निवड करून ऑनलाईन अर्ज सादर करावा.

योजनेच्या अटी, नियम आणि अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित 'तालुका कृषी अधिकारी' कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न