राज्यात लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर पहिल्या टप्प्यात ३७ लाख ५२ हजार गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप सुरू

 



       

ठाणे,दि.11(जिमाक) :- राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगासारख्या घातक संसर्गजन्य आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली असून सन २०२६-२७ या वर्षाकरिता गोटपॉक्स लसीकरण मोहीम अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.  आशी माहिती पशुसंवर्धन  सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय (पशुधन व नियोजन)  पुणे यांनी दिली आहे. 

            २१ व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्ह्यानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन, पहिल्या टप्प्यात एकूण लस उत्पादनाच्या ४० टक्के म्हणजेच तब्बल ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे वाटप अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सुरू करण्यात आले आहे. 'पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे' येथे या आवश्यक लसमात्रांचे यशस्वी उत्पादन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील गोधनाचे संरक्षण करण्यासाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम तातडीने आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

            लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या सर्व जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यंत्रणेला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुरवण्यात आलेली लस शेवटच्या घटकापर्यंत वेळेत पोहोचवताना तिची शीत साखळी (कोल्ड चेन) कुठेही खंडित होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश 'पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे' या संस्थेचे सहआयुक्त डॉ. याहयाखान पठाण यांनी दिले आहेत. गोटपॉक्स लसमात्रा प्राप्त होताच संबंधित जिल्ह्यातील अधिक दूध देणाऱ्या आणि उच्च उत्पादनक्षमता असलेल्या पशुंचे प्राधान्य क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी लसीकरणाचा विहित नमुन्यातील बिनचूक आणि एकत्रित दैनंदिन अहवाल दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत विभागनिहाय संस्थेकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

            या व्यापक मोहिमेत गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला होता, अशा हॉटस्पॉट तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून तेथे प्राधान्य क्रमाने लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी पशुवैद्यक आणि सेवादाते यांचे सक्रिय सहकार्य घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरीय यंत्रणेला करण्यात आले आहे. पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतकरी बांधवांचा मुख्य कणा असल्याने त्यांचे आरोग्य अबाधित राखणे हे पशुसंवर्धन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुपालकांनीही या मोहिमेला पूर्ण सहकार्य करावे. तसेच, पशुधनाच्या कोणत्याही आजारावर घरपोच उपचार मिळवण्यासाठी पशुपालकांनी '१९६२' या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

000000000

                                                                                                     

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न