ठाणे जिल्ह्यात फलोत्पादन विकास आणि राष्ट्रीय कृषि विकास योजनांचा धडाका विविध घटकांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात

 



           

ठाणे, दि.15(जिमाका) :- ठाणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आर्थिक प्रगतीची आणि आधुनिक शेतीची मोठी संधी उपलब्ध झाली असून सन २०२६-२७ या वर्षाकरिता जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांमधील विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील फलोत्पादन क्षेत्राला नवीन गती मिळणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरेल असा विश्वास कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

            एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीकडून आधुनिक आणि व्यापारी शेतीकडे वळविण्यासाठी विविध स्तरांवर अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मिरची लागवड, काळीमिरी, फळबाग लागवड आणि सुटी फुले यांच्या क्षेत्र विस्तारावर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अळिंबी (मशरूम) प्रकल्प उभारणी, जुन्या व अनुत्पादक फळबागांचे पुनरुज्जीवन करणे तसेच अत्यंत फायदेशीर असणाऱ्या औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीसाठीही या योजनेतून मोठी मदत केली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी नियंत्रित शेती घटकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून यामध्ये हरितगृह (ग्रीनहाऊस), शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, प्रभावी तण नियंत्रण, फळ पिकांच्या सुरक्षेसाठी फळांना किंवा त्यांच्या घडांना कव्हर्स घालणे आणि शेताच्या संरक्षणासाठी कुंपण घालणे यासारख्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. शेतीसाठी पाण्याचा शाश्वत स्त्रोत निर्माण व्हावा या हेतूने सामुहिक शेततळे आणि शेततळे अस्तरीकरण या घटकांचाही योजनेत प्रामुख्याने अंतर्भाव आहे.

            केवळ पीक उत्पादन वाढवणे नव्हे, तर पिकांची काढणी झाल्यानंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी या योजनेत काढणीोत्तर पायाभूत सुविधांवर मोठा भर देण्यात आला आहे. या अंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरणाला चालना देण्यासोबतच शेताच्या ठिकाणीच फार्म गेट पॅक हाऊस उभारणी, फळे चांगल्या दर्जाची पिकवण्यासाठी राईपनिंग चेंबर, शीतगृह (कोल्ड स्टोरेज), नियंत्रित वातावरणातील साठवणूक गृह आणि आधुनिक सोलर क्रॉप ड्रायर यांसारख्या सुविधांसाठी मोठे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय शेतमालाच्या मूल्यवृद्धीसाठी प्रक्रिया सुविधा आणि योग्य पणन (मार्केटिंग) व्यवस्थेची साखळी निर्माण करण्यासाठीही निधी दिला जाईल. संशोधन आणि विकास, प्रक्रिया तसेच पणन क्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून या योजनांचे जाळे विस्तारण्यात येत आहे. याच सोबतीला राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत शेततळे अस्तरीकरण आणि कांदा साठवणुकीसाठी अत्यंत आवश्यक असणारी कांदाचाळ उभारणी या महत्त्वपूर्ण बाबींसाठीही अनुदान दिले जात आहे.

            या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावा यासाठी कृषी विभाग सक्रिय झाला आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या नजीकच्या 'आपले सरकार ई-सेवा केंद्रात' किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन महाडीबीटीच्या अधिकृत https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि तेथे 'फलोत्पादन' या घटकाखाली आपला ऑनलाईन अर्ज अचूकपणे सादर करावा. योजनेच्या अटी, नियम, आवश्यक कागदपत्रे आणि अनुदानाच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात न राहता थेट आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न