NEET UG २०२६ परीक्षा पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतला आढावा
ठाणे दि.16(जिमाका):- आगामी २१ जून २०२६ रोजी
होणाऱ्या 'नीट युजी २०२६' (NEET UG 2026) या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील
राष्ट्रीय परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. ही परीक्षा
कोणत्याही त्रुटीशिवाय, अत्यंत पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज शासकीय
अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन परीक्षा तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या राष्ट्रीय
परीक्षेची संवेदनशीलता आणि गतवेळच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात
घेता, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर चोख नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी दिले.
या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस तहसिलदार
(महसूल) रेवण लेंभे, तहसिलदार (करमणूक) मीनल दळवी यांच्यासह परीक्षा प्रक्रियेशी संबंधित
विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन
करताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, यंदा राष्ट्रीय परीक्षा
संस्थेने (NTA) संपूर्ण देशभरात आणि परदेशातील केंद्रांवर एकाच दिवशी परीक्षा घेण्याचे
नियोजन केले असून, देशपातळीवर २२.७९ लाख उमेदवारांची नोंदणी झाली आहे. ठाणे
जिल्ह्यात एकूण 25 परीक्षा केंद्र जिल्ह्यातूनही 12325 विद्यार्थी या परीक्षेला बसणार
असल्याने प्रत्येक परीक्षा केंद्राची सज्जता अंतिम टप्प्यात आणणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी
राष्ट्रीय स्तरावर ६७४ शहर समन्वयक, ५,४४६ केंद्र अधीक्षक आणि सुमारे १.९० लाख पर्यवेक्षकांची
मोठी यंत्रणा कार्यरत आहे. आपल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था
अबाधित राखण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि परीक्षा केंद्र प्रमुख
यांनी परस्परांशी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या परीक्षेच्या
नियमांनुसार दुपारी ०१:३० वाजता परीक्षा केंद्रांचे मुख्य गेट बंद केले जाणार
असून, त्यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांनी
अधोरेखित केली. तसेच उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी झाल्यानंतरच त्यांच्या प्रवेशपत्रावर
'होलोग्राम' स्टिकर लावला जाईल. परीक्षा केंद्रांवर जॅमर, सीसीटीव्ही कॅमेरे, वीज पुरवठा
आणि जनरेटरची बॅकअप व्यवस्था दुपारी १२:०० वाजेपर्यंतच तपासून पूर्ण करण्याचे
आदेश त्यांनी यंत्रणेला दिले. परीक्षा दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:१५ या वेळेत होणार
असून उमेदवारांना १९५ मिनिटांचा कालावधी मिळेल. या संपूर्ण प्रक्रियेत मोबाईल
फोन किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला परीक्षा केंद्रात प्रवेश असणार नाही, अगदी
कर्तव्यावर असणाऱ्या कोणत्याही शासकीय किंवा परीक्षा कर्मचाऱ्यालाही परीक्षा केंद्रात
मोबाईल वापरता येणार नाही, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश डॉ. पांचाळ
यांनी दिले.
बैठकी दरम्यान
तहसिलदार (महसूल) रेवण लेंभे आणि तहसिलदार (करमणूक) मीनल दळवी यांनी परीक्षा केंद्रांच्या
परिसरातील सुरक्षा व्यवस्था, गोपनीय साहित्याची वाहतूक आणि केंद्र स्तरावरील नियोजनाबाबत
जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. परीक्षा संपल्यानंतर मूळ गुलाबी रंगाची ओएमआर
(PINK OMR) उत्तरपत्रिका उमेदवारांच्या उपस्थितीतच सील करून, त्यावर दोन उमेदवार साक्षीदारांच्या
स्वाक्षऱ्या घेण्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत
पालन करण्याबाबत केंद्र प्रमुखांना निर्देशित करण्यात आले आहे. ही सर्व वाहतूक आणि
साहित्याची देवाणघेवाण 'एनटीए लॉजिस्टिक्स ट्रॅकिंग ॲप'द्वारे क्यूआर कोड स्कॅन करून
रिअल-टाइम ट्रॅक केली जाणार आहे. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळून
आल्यास सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) अधिनियम, २०२४ अंतर्गत संबंधित
व्यक्तींवर तात्काळ कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.
श्रीकृष्ण पांचाळ यांनी या बैठकीत दिला.
00000
.jpeg)
Comments
Post a Comment