प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्यात सव्वा लाख लाभार्थ्यांची नोंदणी लाभार्थ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचा लाभ तातडीने द्यावा
ठाणे,
दि. 18 (जिमाका) :- प्रधानमंत्री मातृवंदना
योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये आता पर्यंत 1 लाख 24 हजार 742 लाभार्थ्यांची नोंद झाली आहे.
लाभार्थ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचा लाभ तातडीने मिळावा यासाठी तालुका वैद्यकीय
अधिकाऱ्यांनी समन्वयातून प्रयत्न करावेत असे निर्देश आज झालेल्या जिल्हास्तरीय सुकाणू
व सनियंत्रण समितीच्या बैठकीत देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन
विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत
तीन टप्प्यामध्ये पाच हजार रुपये लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात.
जिल्ह्यातील तसेच महापालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांना त्यांचा दुसरा आणि तिसरा हप्ता
तातडीने वर्ग करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रयत्न करावेत असे श्री.ठोंबरे यांनी यावेळी
सांगितले. आवश्यकता भासल्यास आधारक्रमांक नोंदणीसाठी विशेष शिबीरे आयोजित करावेत. त्याच
प्रमाणे अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकाने सर्व बँकांना निर्देश देऊन लाभार्थ्यांचे खाते
कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे उघडण्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश
त्यांनी यावेळी दिले.
अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर
या तालुक्यातील ग्रामीण भागात या योजनेंतर्गत आता पर्यंत 28 हजार 922 लाभार्थ्यांची
नोंद झाली असून ही उद्दिष्टाच्या 109 टक्के असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अंबरनाथ
आणि बदलापूर नगरपालिकांच्या क्षेत्रात 7 हजार 172 लाभार्थ्यांची नोंद असून भिवंडी
, कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर शहरी भागात 88 हजार
648 लाभार्थ्यांची नोंद झाली आहे,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी सांगितले.
00000000
Comments
Post a Comment