निवृत्ती वेतनासंदर्भातील अडचणींबाबत ठाणे कोषागार कार्यालयामधील कार्यशाळेत मार्गदर्शन
पेन्शन अदालतीमध्ये झाले निवृत्तीवेतनधारकांच्या शंकाचे निरसन
ठाणे,दि.३ (जिमाका) : सेवानिवृत्तांचे वेतन व भविष्य निर्वाह निधीसंबंधी येणाऱ्या अडचणीसंदर्भात तातडीने मार्ग काढून त्यांना वेळेवर निवृत्तीवेतन मिळेल यासाठी विविध विभागांच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन लेखा व कोषागारे विभागाचे सहसंचालक अनुदीप दिघे यांनी आज येथे केले.
महालेखापाल कार्यालयाच्यावतीने ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयात जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर, उपमहालेखापाल (निवृत्ती वेतन) जिशू राजू, लेखा अधिकारी किर्ती दुभाषी, सहायक लेखा अधिकारी श्रीम. डी एन. पुजारी, वरिष्ठ लेखाधिकारी संध्या प्रभू उपस्थित होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नामनिर्देश पत्र भरुन घेताना घ्यावयाची काळजी, भविष्य निर्वाह निधीतून देयक बनवताना घ्यावयाची काळजी, मुदत पूर्व सेवानिवृत्ती वेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, सेवानिवृत्त व कुटुंब निवृत्तीवेतन इत्यादी विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी, लेखा लिपिक उपस्थित होते.
पेन्शन अदालतीमध्ये जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी केले शंकांचे निरसन
दुसऱ्या सत्रामध्ये ठाणे जिल्हयातील
निवृत्ती वेतनधारकांची पेन्शन अदालत घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हा कोषागार अधिकारी
राजेश भोईर, उपमहालेखापाल जिशू राजू यांनी सुमारे ४७ निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या
जाणून त्यांना मार्गदर्शन केले तसेच विविध शंकांचे निरसनही त्यांनी केले. निवृत्तीवेतन
धारकांनी त्यांची तक्रार ऑनलाईन महालेखापाल कार्यालयामध्ये कशी करावी या विषयी मार्गदर्शन
यावेळी करण्यात आले.
0000000
Comments
Post a Comment