गुंतवणूकदार उद्योजकांचे जिल्ह्यात स्वागत.. उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे


ठाणे,दि.26(जिमाका):- जिल्ह्यामध्ये औद्योगिक धोरण राबविताना विविध ठिकाणांवरून येणाऱ्या गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि गुंतवणूक वाढावी, याकरिता सामूहिक प्रयत्न करण्यात येतील. यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.

मिशन 100 डेज् अंतर्गत गुंतवणूक प्रचार-प्रसार आणि प्रोत्साहन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

शासनाने क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा 7 कलमी कृती आराखडा निश्चित करून त्याची प्रभावी कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे. शासन निर्णयातील 7 कलमी कृती आराखड्यामध्ये गुंतवणूकीस प्रोत्साहन अंतर्गत गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि गुंतवणूक वाढावी याकरिता सामूहिक प्रयत्न करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी फेडरेशन ऑफ इंडस्ट्रिज ऑफ इंडियाचे अध्यक्ष भालचंद्र रावराणे, रवींद्र सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा कृषी अधीक्षक रामेश्वर पाचे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे, आदिवासी विकास प्रकल्प सहाय्यक प्रकल्प अधिकारी पूजा हिप्परगेकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सुनील भुताळे, एमएमआरडीएचे वरिष्ठ रचनाकार अमित सावंत, रचनाकार तृप्ती राणे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अभिषेक पवार, कार्यकारी अभियंता श्री.कांबळे, उपकार्यकारी अभियंता जगदीश सोनार, ठाणे ग्रामीण पोलीस उप अधीक्षक प्रमोद बाबर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, व्यवस्थापक अश्विनी कोकाटे, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.पिरवानी, नवी मुंबई विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले की, व्यापारी वर्गाच्या संघटनांशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. गुंतवणूकदार उद्योजकांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण तसेच कायदा व सुव्यवस्था या बाबींची प्रभावीपणे हाताळणी करावी. कौशल्य प्रशिक्षणाच्या गरजांची तपासणी करावी. तसेच क्षेत्रानुसार कौशल्य प्रशिक्षण देण्यात यावे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उद्योग प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होईल हे पाहावे.

प्रास्ताविकात उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या सर्व योजना व कार्यक्रम (PSI, CMEGP, ODOP, निर्यात प्रोत्साहन कार्यक्रम, Ignite कार्यक्रम), निर्यात परिषद - महाराष्ट्र राज्याच्या निर्यातीची माहिती (ठाणे जिल्ह्यातून 52 हजार कोटी रुपयांची निर्यात), शासनाचा 7 कलमी कृती आराखडा, सामंजस्य करारातील गुंतवणूक आणि त्याचा पाठपुरावा, 95% सामंजस्य करार अंमलबजावणीच्या टप्प्यात, प्रादेशिक गुंतवणूक शिखर बैठक, एमएसएमई क्षेत्रावर लक्ष केंद्रित असून त्याकरिता 4 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूकीचे उद्दिष्ट, 22 निर्यात प्रोत्साहन परिषदा (उदा. FIEO), जिल्हा वेबसाईटवर निर्यात डॅशबोर्ड आदी विषयांबाबत माहिती दिली.

00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न