79 व्या स्वातंत्र्यदिनासाठी राजशिष्टाचार जारी; ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय कार्यक्रम


ठाणे,दि.11(जिमाका):-  येत्या शुक्रवारी, दि.15 ऑगस्ट 2025 रोजी भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन देश/राज्यभर साजरा केला जाणार आहे. यानिमित्त, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राजशिष्टाचार शाखेमार्फत एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका आणि ग्रामपंचायत मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल.

राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुंबईतील मंत्रालयात सकाळी 9.05 वाजता मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा होईल. त्याच वेळी, पुणे येथे राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल. त्याचवेळी राज्यभर एकाचवेळी सकाळी 9.05 वाजता विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि सरपंच किंवा गाव प्रमुखांनी आपापल्या मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण करतील.

इतर कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयांना त्यांचा स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करायचा असल्यास, तो सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 नंतर करावा. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर लगेचच राज्यगीत वाजविले जाईल. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.05 वाजता आयोजित केला जाईल.

या दिवशी वृक्षारोपण, आंतरशालेय/आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, देशभक्तीपर निबंध आणि कविता स्पर्धा यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित करावेत. तसेच, देशभक्तीपर गीते आणि भाषणांचे आयोजन करून शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करावी. सर्व सार्वजनिक, शासकीय आणि ऐतिहासिक इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविला जावा.

समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्वांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, शौर्य पुरस्कार विजेते आणि प्रमुख नागरिकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करावे, अशा महत्वाच्या सूचनाही या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी