ठाणे जिल्ह्यात iPAS प्रणालीचे प्रशिक्षण ; जिल्हा नियोजन समित्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणि गती
ठाणे,दि.20 (जिमाका) :- ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांसाठी जिल्हा
नियोजन समितीमार्फत आज iPAS – Integrated Planning Office Automation System हाताळण्याचे
प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हा नियोजन भवनाच्या पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात हा प्रशिक्षण पार पडले.
राज्य शासनाने जिल्हा नियोजन समित्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध
योजनांच्या अंमलबजावणीसाठी विकसित केलेल्या iPAS प्रणालीचा 100 टक्के वापर सर्व जिल्हा
नियोजन समिती कार्यालयांसह सर्व प्रशासकीय कार्यालयांना अनिवार्य केला आहे.
जिल्हा नियोजन मंडळाच्या (District Planning Committee - DPC)कामकाजात
अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणि गती निर्माण करण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरणार
आहे. ‘कागदाचा कमीत कमी वापर’ या राज्य शासनाच्या धोरणानुसार राज्यातील सर्व 36 जिल्हा
नियोजन समित्या iPAS च्या माध्यमातून पूर्णपणे कागदविरहित (Paperless) प्रक्रियेकडे
वळल्या आहेत.
या प्रणालीमुळे प्रशासकीय मंजुरी (Administrative Approvals), निधी
व्यवस्थापन (Fund Management) आणि प्रकल्पांचे सनियंत्रण (Monitoring) अधिक सोपे व
सुलभ झाले आहे. विशेष म्हणजे, iPAS प्रणालीची वित्त विभागाच्या BEAMS (Budget
Estimation, Allocation & Monitoring System) या प्रणालीशी जोडणी केल्याने निधीवाटप
प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि वेग आला आहे.
या प्रशिक्षणाचे संचालन जितेश जावळे आणि प्रदीप पोदार यांनी ऑनलाइन
पद्धतीने केले. प्रशिक्षणासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांतील अधिकारी
आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

Comments
Post a Comment