आता गंभीर आजारांवर घरपोच 'उपशामक काळजी' (Palliative Care)
ठाणे,दि.26(जिमाका):- राज्यात वाढते कर्करोग, हृदयरोग
आणि वृद्धापकाळाशी संबंधित आजार लक्षात घेऊन, महाराष्ट्र
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 'राज्य
पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमा'ची
(State Palliative Care
Programme) व्याप्ती
वाढविण्याचा आणि तो अधिक सक्षम करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या
निर्णयानुसार आता केवळ रुग्णालयातच नव्हे, तर 'आरोग्यवर्धिनी केंद्रां'च्या माध्यमातून गावागावात आणि रुग्णांच्या घरी
जाऊन उपशामक सेवा पुरविली जाणार आहे.
'पॅलिएटिव्ह केअर' म्हणजे काय?
अनेकदा
'पॅलिएटिव्ह केअर' म्हणजे केवळ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील सेवा असा समज असतो.
मात्र, शासनाच्या नवीन निर्णयानुसार, आता आजाराचे निदान झाल्यापासून उपचारांच्या
संपूर्ण कालावधीत रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना शारीरिक, मानसिक, सामाजिक
व आध्यात्मिक आधार दिला जाईल. याचा उद्देश रुग्णाचे जीवन सुसह्य करणे आणि वेदना
कमी करणे हा आहे.
कार्यक्रमाची
ठळक वैशिष्ट्ये:
1. घरोघरी आरोग्य सेवा (Home-based Care) :
समुदाय
आरोग्य अधिकारी (CHO), ए.एन.एम. (ANM) आणि आशा सेविका (ASHA) यांच्या माध्यमातून रुग्णांचे सर्वेक्षण करून
त्यांना घरीच सेवा दिली जाईल. रुग्णांच्या गरजेनुसार (जास्त, मध्यम किंवा कमी) आठवड्यातून किंवा महिन्यातून
एकदा गृहभेट देऊन त्यांची तपासणी केली जाईल.
2. मोफत औषधे आणि 'होम केअर किट':
तीव्र वेदना कमी करण्यासाठी 'मॉर्फिन' (Morphine) सारखी औषधे आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध करून दिली
जातील. तसेच, घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी विशेष 'होम केअर किट' (Home Care Kit) पुरविले जाईल, ज्यामध्ये ड्रेसिंग साहित्य, आवश्यक
औषधे आणि उपकरणांचा समावेश असेल.
3. रुग्णालयांमध्ये राखीव खाटा:
जिल्हा
रुग्णालयात 4 ते 6 खाटा, तर ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात
किमान 2 खाटा 'पॅलिएटिव्ह केअर' रुग्णांसाठी
राखीव असतील. तसेच आठवड्यातून एकदा स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग (OPD) चालवला जाईल.
4. कोणत्या आजारांचा समावेश?
कर्करोग, अर्धांगवायू (Stroke), पार्किन्सन,
किडनी किंवा यकृत निकामी होणे, दीर्घकालीन श्वसन विकार, वृद्धापकाळातील अशक्तपणा आणि इतर दुर्धर आजार.
5. समुपदेशन आणि प्रशिक्षण:
केवळ
रुग्णच नाही, तर त्यांच्या कुटुंबियांना आणि
काळजीवाहूंना (Caregivers)
रुग्णाची काळजी कशी घ्यावी, याचे प्रशिक्षण आणि मानसिक आधार दिला जाईल.
6.
24
तास मदतवाहिनी (Helpline)
:
रुग्णांच्या
मदतीसाठी '108/102' रुग्णवाहिका सेवेसोबतच, 'साथ-साथ' (1800-202-7777) आणि मानसिक आरोग्यासाठी 'टेलीमानस' (1800-89-14416) या टोल-फ्री क्रमांकांची सुविधा उपलब्ध
असेल.
लोकसहभाग
आणि पुरस्कार:
या
कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती आणि स्वयंसेवी संस्थांचा
शासनातर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
ठाणे
ग्रामीण भागामध्ये एकूण 844 रुग्णांना या palliative care कार्यक्रमाअंतर्गत घरी जाऊन आवश्यक त्या आरोग्य
उपचार सेवा व समुपदेशन करण्यात येणार आहे.
या
निर्णयामुळे राज्यातील सामान्य नागरिकांना, विशेषतः
ग्रामीण भागातील रुग्णांना,
त्यांच्या राहत्या घरीच सन्मानाने
जगण्यासाठी आणि वेदनामुक्त उपचारांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
ठाणे
जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व ठाणे जिल्हा
परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत
असून या कार्यक्रमाची तांत्रिक अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार व
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांच्या अधिपत्याखाली केली जात आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे डॉ.गंगाधर परगे यांनी कळविले
आहे.
00000
Comments
Post a Comment