महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 चे 28 जून 2026 रोजी आयोजन

 




ठाणे,दि.19(जिमाका) :- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 चे आयोजन दि.28 जून 2026 रोजी करण्यात आलेले आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील 37 जिल्हास्तरावर जिल्ला मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण 1729 केंद्र निश्चित केले आहेत.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता, परीक्षा (MAHATET) 2026 परीक्षेचे आयोजनाची कार्यवाही सुरु असून परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती व सूचना देण्यात येत आहे.

परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची उमेदवारांची सांखिकिय माहिती पुढील प्रमाणे -

पेपर - पेपर 1,  प्रविष्ठ परिक्षार्थीची संख्या - 258061, वर्गखोली संख्या - 10946.

पेपर - पेपर 2,  प्रविष्ठ परिक्षार्थीची संख्या - 342064, वर्गखोली संख्या - 14568.

एकूण - प्रविष्ठ परिक्षार्थीची संख्या - 600125.

सदर परीक्षा पेपर 1 साठी 701 केंद्र तर पेपर 2 साठी 1028 केंद्रावर वर्गखोली, प्रवेश, लॉबी, केंद्र संचालक कक्ष असे एकूण 18717 CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावर परीक्षा पारदर्शक व निकोप वातावरणात पार पाडावी व कोणताही गैरप्रकार होवू नये या दृष्टीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सुरक्षा तपासणीसाठी अनुषंगीक सुविधा दिलेल्या आहे.

सदर सुविधा खालीलप्रमाणे :-

1. Frisking (HHMD) :- परीक्षा केंद्रात प्रवेश करताना प्रत्येक परीक्षार्थी व परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व परीक्षार्थी यांचे मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने Frisking केले जाणार आहे. परीक्षाधीनी इलेक्ट्रॉनिक साहित्य उदा. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर इत्यादी उपकरणे परीक्षा केंद्रात घेऊन जाता येणार नाही.

2. परीक्षाची यांचे बायोमेट्रीक, Face Recognition व तपासणी :- परीक्षा केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येक परीक्षार्थींची हॅन्ड हेल्ड मेटल डिटेक्टरच्या (HHMD) सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. तसेच (Biometric) बायोमेट्रीक घेतले जाणार आहे. प्रत्येक परीक्षार्थ्यांचे Face Recognition केले जाणार आहे. आवेदनपत्राच्या मूळ डाटाबेसशी साधर्म्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसच प्रवेश दिला जाणार आहे. काही वेळा मूळ डाटाबेसशी विद्यार्थ्यांचे Face Recognition माहिती न जुळल्यास केंद्रसचांलकांनी प्रत्यक्ष व्यक्ती, त्यांचे आयकार्ड, प्रवेशपत्रावरील फोटो यांची खातरजमा करून ओळख पटल्यानंतर त्या परीक्षार्थीच्या प्रवेशाबाबत देण्यात येणार आहे. तसेच संशयीत उमेदवारांबाबत आधार पडताळणी देखील परीक्षा कालावधीलच करण्यात येणार आहे. मूळ विद्यार्थ्यांऐवजी अन्य उमेदवार प्रवेश करत असल्याचे आढळल्यास त्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षार्थींना परीक्षा देण्यास कोणत्याही अडचण येऊ नयेत यासाठी परीक्षार्थींनी काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर आधार बायोमॅट्रीक व फ्रीस्कीग होणार असल्यामुळे परीक्षार्थींनी पेपर 1 ला सकाळी 8:30 वाजता व पेपर 2 ला 12:30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. सकाळच्या पेपरला सकाळी 10:10 मिनिटानंतर आणि पेपर 2 ला दुपारी 2:10 मिनिटानंतर कुणालाही प्रवेश मिळणार नाही.

परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी Frisking करीता 100 ऐवजी 70 उमेदवारांसाठी एक तंत्रज्ञ आणि बायोमेट्रिक हजेरीसाठी 80 ऐवजी 75 उमेदवारांसाठी एक तंत्रज्ञ अशी व्यवस्था यावेळी केलेली आहे.

3. CCTV कॅमेरे :- सर्व परीक्षा दालनामध्ये, परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर व केंद्रसंचालकाच्या कक्षात CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. एकूण १४५६८ वर्ग खोल्यांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहे. सदर कॅमेऱ्यांचा Live Access जिल्हा संनियंत्रण कक्ष/शिक्षणाधिकारी कार्यालय व परीक्षा परिषदेत घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्व परीक्षा दालनांवर जिल्हा व राज्य स्तरावरून सनियंत्रण ठेवले जाणार आहे. सदर Access हा Artificial Intelligence Based असल्याने अत्यंत काटेकोरपणे हे सनियंत्रण होणार आहे. पामध्ये CCTV बाबत गैरकृत्य केल्यास, पर्यवेक्षकांनी वेळोवेळी परीक्षा कक्षात फेऱ्या न मारल्यास, विद्यार्थ्यांनी त्यांची बैठक व्यवस्था हलवल्यास अथवा परीक्षेच्या अनुषंगाने अनावश्यक हालचाली इत्यादी बाबी झाल्यास लगेचच सूचना जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षास व परीक्षा परिषदेस प्राप्त होणार आहे. AI आधारीत CCTV द्वारे गोपनीय साहित्य पेटी उघडण्याची वेळ नियंत्रित केली जाणार आहे.

4. CONNECT VIEW : Connect View मध्ये तात्काळ संपर्कासाठी, Message Broadcast साठी प्रत्येक परीक्षा केंद्रसंचालक, परीक्षा संनियंत्रण कक्ष व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कक्ष यांच्याकडे इंटरनेटचे फोन उपलब्ध असतील, सदर सुविधेमार्फत आवश्यकतेनुसार संबंधितांशी संपर्क साधला जाईल व या फोनच्या माध्यमातून दिवसभर नियमीतपणे केंद्रसंचालकासाठी विविध सूचना एकाचवेळी निर्गमित करता येतील, दिलेल्या सुचनांचे (Broadcast) संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध असणार आहे, जेणेकरून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमधील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राहून परीक्षा शिस्तबध्द पद्धतीने घेता येऊ शकेल.

PHOTO VIEW :- Photo View या सुविधेतील पहिली सुविधा म्हणजे Photo View मध्ये मागील केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मागील वर्षामध्ये घेण्यात आलेल्या सर्व महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 परीक्षांमधील उमेदवारांचे (Proxy Exam Prevention) फोटो व नावे आपल्या या परीक्षेमधील उमेदवारांसोबत पडताळणी करण्यात येणार (Historical Analysis) असून, एक उमेदवार व दोन वेगवेगळे फोटो (Morphed Photo Detection) किंवा एकच फोटो मात्र दोन वेगवेगळी नावे (Impersonation Prevention) असलेल्या उमेदवारांची यादी, तसेच एकाच उमेदवाराने वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर अनेक आवेदनपत्र भरलेले असल्यास (Duplicate Application Prevention) अशा उमेदवारांची यादी आपल्याला परीक्षेपूर्वीच पडताळणीसाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे परीक्षेपूर्वी तसेच परीक्षेच्या वेळी देखील बोगस डमी विद्यार्थ्यांची ओळख तात्काळ करता येणार आहे.

उमेदवारांसाठी सूचना :- परीक्षेला जातांना परीक्षार्थींनी आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, मतदान कार्ड यापैकी एक फोटो ओळखपत्राची मूळ व सत्यप्रत सोबत ठेवावे. परीक्षा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जसे की, मोबाईल, पेजर, डिजीटल घड्याळ, पेन इत्यादी नेण्यास सक्त मनाई आहे. परीक्षा केंद्रामध्ये CCTV चा अनिवार्यपणे वापर करण्यात येणार असल्याने संपूर्ण चेहरा स्पष्टपणे दिसावा यासाठी दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी यापैकी काहीही घालता येणार नाही. गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी उत्तर पत्रिका (OMR) सोबत दोन कार्बन कॉपी असणार आहेत, एक कार्बन कॉपी उमेदवारांसाठी असेल व दूसरी कार्बन कॉपी परीक्षा परिषदेची असेल. यावेळी प्रथमच प्रश्नपत्रिकेमधील प्रत्येक पानावर विशिष्ट क्रमांक (यूनिक नंबर) व क्यू आर (QR) कोड असणार आहे. यामुळे प्रत्येक उमेदवाराची प्रश्नपत्रिका ही कोणत्याही टप्प्यावर ओळखता येऊ शकेल. परीक्षेमध्ये प्रत्यक्षात किती प्रश्न सोडविले? याबाबतची संख्या उत्तरपत्रिकेमध्ये अनिवार्यपणे नमूद करावयाची आहे. गोपनीय साहित्य जिल्ह्याला प्राप्त झाल्यापासून ते परीक्षा संपल्यानंतर कंट्रोल रूम ला जमा करेपर्यंत सर्व प्रक्रिया व्हिडिओ रेकॉडोंग व सी.सी.टीव्ही रेकॉर्डिंग मध्ये होणार आहे. संचालक, सहसंचालक व उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे भरारी पथक प्रत्येक जिल्ह्यासाठी राहील.

दिव्यांग परीक्षार्थीसाठी सूचनाः- ज्या दिव्यांग परीक्षार्थींना लेखनिक घ्यावयाचा असेल, त्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडून तशी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लेखनिकासह शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद कार्यालयास भेट द्यावी. लेखनिक हा इयत्ता 12 वी पेक्षा जास्त शिकलेला नसावा व त्याचे वय दि.28 जून 2026 रोजी 19 वर्षापेक्षा कमी असावे. तसेच तो उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य नसावा. ऐनवेळी परीक्षा केंद्रावर लेखनिकास परवानगी मिळणार नाही याची नोंद घ्यावी. प्रवेशपत्र उमेदवारांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने दि. 16 जून 2026 पासून उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावेत. वेळेवर धावपळ टाळण्यासाठी आपल्याला मिळालेल्या परीक्षा केंद्राचा पत्ता अगोदरच माहिती करून घ्यावा.

दि.23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ज्या उमेदवानांनी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला होता, अशा एकूण 22 उमेदवारांची परीक्षेमधील संपादणूक रद्द करण्यात आली आहे.

परीक्षेसंबंधी युट्युब चॅनेल्स, सोशल मिडिया प्लैटफॉर्मद्वारे व प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणा-या बातम्या अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in  http://mahatet.in अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचना व माहितीचे अवलोकन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार/विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त महेश चोथे यांनी कळविले आहे.

0000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न