विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) बाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न

 





 

ठाणे,दि.18(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या दि. १४ मे २०२६ च्या सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या 'विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची (SIR)' पूर्वतयारी आणि अंमलबजावणी याविषयी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात ही बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.   

या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, तहसिलदार प्रदीप कुडाळ आणि विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ, सद्यस्थितीतील मतदार संख्या आणि मतदान केंद्रनिहाय रचनेबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर मतदारसंघनिहाय सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या (SIR) ऑनलाइन मॅपिंगच्या प्रगतीचा आणि टक्केवारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नियुक्तीबाबत राजकीय पक्षांनी केलेल्या कामाची सद्य:स्थिती जाणून घेत, सर्वच पक्षांनी यात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे नियोजित वेळापत्रक...

या मोहिमेंतर्गत अर्हता दिनांक १ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आला असून, निवडणूक प्रशासनाने पुढीलप्रमाणे महत्त्वपूर्ण कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे:

 दि. २० जून ते २९ जून २०२६ : प्रशिक्षण, प्रशासकीय तयारी आणि आवश्यक साहित्याची छपाई.

दि. ३० जून ते २९ जुलै २०२६ : मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी मोहीम.

दि. २९ जुलै २०२६ पर्यंत : मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण पूर्ण करणे.

दि. ५ ऑगस्ट २०२६: प्रारूप मतदारयाद्यांची अधिकृत प्रसिद्धी.

दि. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६: मतदारयादीबाबत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी.

दि. ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६: नोटीस टप्पा आणि प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया.

दि. ७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादीची जाहीर प्रसिद्धी.

     यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी बैठकीत या मोहिमेच्या तांत्रिक आणि क्षेत्रीय कामाची सविस्तर माहिती दिली. दि. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत 'बीएलओ' (BLO) प्रत्येक घरात प्रत्यक्ष भेट देतील. या भेटीदरम्यान मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदाराला दोन प्रतींमध्ये 'Enumeration Form' दिला जाईल. यातील एक प्रत आवश्यक माहिती भरून आणि मतदार किंवा कुटुंबप्रमुखाची स्वाक्षरी घेऊन बीएलओ जागेवरच संकलित करतील, तर दुसरी प्रत मतदाराला पोचपावती म्हणून दिली जाईल.

अपुरी माहिती असलेल्या मतदारांसाठी सुनावणी आणि आवश्यक कागदपत्रे...

ज्या मतदारांची माहिती मागील (SIR) (२००२) च्या मतदार यादीत उपलब्ध नाही किंवा निवडणूक आयोगाच्या मुख्य डेटाबेसशी जुळत नाही, अशा मतदारांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून (ERO) रीतसर सुनावणीची नोटीस बजावण्यात येईल. अशी नोटीस मिळताच संबंधित मतदारांनी आपले नागरिकत्व व जन्म सिद्ध करणारे खालील पुरावे सादर करणे बंधनकारक राहील :

१. दि.१ जुलै १९८७ पूर्वी भारतात जन्म झालेल्यांसाठी: स्वतःची जन्मतारीख आणि जन्मस्थान सिद्ध करणारा कोणताही एक वैध दस्तऐवज.

२. दि.१ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ या कालावधीत जन्मलेल्यांसाठी: आई किंवा वडील यांपैकी कोणाचाही जन्म भारतात झाल्याचा व जन्मतारीख सिद्ध करणारा पुरावा.

३. दि.२ डिसेंबर २००४ नंतर भारतात जन्मलेल्यांसाठी: पालकांपैकी कोणीही भारतीय नागरिक नसल्यास, मतदाराच्या जन्माच्या वेळचा पालकांचा वैध पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत.

४. भारताबाहेर जन्म झालेल्यांसाठी : परदेशातील भारतीय दूतावासाने जारी केलेला जन्मनोंदणीचा अधिकृत पुरावा.

५. नागरिकीकरणाद्वारे नागरिकत्व मिळालेल्यांसाठी : भारत सरकारचे नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्र.

या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी अंतिम मतदार यादी छपाई होईपर्यंत दर आठवड्याला नियमित आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. या साप्ताहिक बैठकांना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सातत्याने उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींचा (BLA) सहभाग वाढवावा, असे आवाहन या बैठकीत प्रशासनातर्फे करण्यात आले.

000000000000

 

 


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न