सन २०२५-२६ या पुरस्कार वर्षाकरिता ठाणे जिल्ह्यातील पात्र युवक, युवती तसेच नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन
ठाणे,दि.7(जिमाका)
: महाराष्ट्र शासन,
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राज्याचे युवा धोरण-२०१२ अंतर्गत निर्गमित
केलेल्या शासन निर्णय क्रमांक युकयो-२०१२/प्र.क्र.६५/क्रीयुसे-३, दि.१२नोव्हेंबर २०१३ अन्वये राज्यातील
युवक-युवती तसेच युवक विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांच्या
उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार व राज्य युवा पुरस्कार योजना
राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने सन २०२५-२६ या पुरस्कार वर्षाकरिता ठाणे जिल्ह्यातील पात्र युवक,
युवती तसेच नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पुरस्काराचा उद्देश युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची
भावना निर्माण करणे, राष्ट्रनिर्माण व समाजोपयोगी कार्यामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या
युवक-युवती व संस्थांचा गौरव करणे तसेच इतर युवकांना प्रेरणा देणे हा आहे. जिल्हास्तरावर
उत्कृष्ट एक युवक, एक युवती आणि एक संस्था यांची निवड करण्यात येणार असून, युवक व युवती
यांना प्रत्येकी रु.10 हजार, संस्थेस रु.50 हजार रोख पारितोषिक, गौरवपत्र व सन्मानचिन्ह
प्रदान करण्यात येईल.
पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक अथवा युवतीचे वय
दि.01 एप्रिल 2025 रोजी 13 वर्षे पूर्ण असावे व दि.31 मार्च 2026 रोजी 35वर्षांपेक्षा
अधिक नसावे. तसेच अर्जदाराचे ठाणे जिल्ह्यात सलग किमान पाच वर्षे वास्तव्य असणे आवश्यक
आहे. संस्थांच्या बाबतीत संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, 1950 अथवा
सोसायटी नोंदणी अधिनियम, 1860 अंतर्गत नोंदणीकृत असून किमान पाच वर्षे कार्यरत असणे
आवश्यक आहे.
ग्रामविकास, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण, शिक्षण,
आरोग्य, युवक विकास, क्रीडा, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, आपत्ती व्यवस्थापन,
विज्ञान-तंत्रज्ञान, सांस्कृतिक क्षेत्र, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय, वंचित घटकांचा
विकास तसेच समाजोपयोगी क्षेत्रात मागील तीन वर्षांमध्ये केलेल्या उल्लेखनीय व सातत्यपूर्ण
कार्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार आहे.
इच्छुक युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांनी शासनाने
विहित केलेल्या नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
ठाणे येथे दि.31 ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे सादर
करावेत. अपूर्ण, आवश्यक कागदपत्रांशिवाय अथवा विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज
विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्जाचा विहित नमुना, पात्रतेचे निकष, आवश्यक कागदपत्रांची
यादी व इतर माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध
आहे. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.
ठाणे जिल्ह्यात युवक विकास, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा,
शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, राष्ट्रीय एकात्मता व इतर समाजोपयोगी क्षेत्रात उल्लेखनीय
कार्य करणाऱ्या पात्र युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थांनी या पुरस्कारासाठी मोठ्या
संख्येने अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी,
ठाणे सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.
00000000
Comments
Post a Comment