कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेचा धडाका थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचले जिल्हाधिकारी..!

 





 

ठाणे,दि.2(जिमाका) :- ठाणे जिल्ह्यात लोकशाही बळकटीकरणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, १४७-कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी आणि जनजागृती मोहिमेने कमालीची गती घेतली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीम. वैशाली माने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय यंत्रणा थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचली असून, नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन ‘Enumeration Form’ (गणना अर्ज) वाटप करण्यात येत आहे.

            या मोहिमेला नागरिकांकडून कमालीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.

            या महत्त्वपूर्ण प्रसंगी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरुषोत्तम थोरात, ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका श्रीम. नम्रता भोसले-जाधव, निवडणूक नायब तहसिलदार संजय साळुंके, बी.एल.ओ. उमेश खेडकर आणि महसूल सहाय्यक बापू पारेकर यांच्यासह इतर शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            या अधिकाऱ्यांच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदार यादी भाग क्रमांक २९७ मधील रहिवासी श्री. सुरेंद्र इंदर भाटिया, श्रीम. कविता सुरेंद्र भाटिया, श्री. विनोद गंगाधर पेणकर आणि श्रीम. जयश्री विनोद पेणकर या मतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात 'Enumeration Form' सुपूर्द करून मोहिमेचा प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला.

            ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारांसाठी दि. ३० जून ते २९ जुलै २०२६ हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून, या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक कुटुंबाला घरोघरी जाऊन भेट देत आहेत. या भेटीदरम्यान अधिकारी नागरिकांकडून गणना प्रपत्र भरून घेणार असून, यामध्ये नाव, लिंग, वय, नातेसंबंध, मोठ्या संख्येने वंशज जोडणी, पालकांच्या तपशिलातील तफावत आणि जुळवणी न झालेले मतदार यांच्या माहितीचे अचूक वर्गीकरण व चिन्हांकन केले जाणार आहे. या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील सर्व त्रुटी पूर्णपणे दूर करून ती अद्ययावत करणे हा आहे. या प्रक्रियेअंतर्गत मतदारसंघात नव्याने राहण्यास आलेल्या नागरिकांची नोंद केली जाईल, तसेच जे मतदार उपलब्ध झाले नाहीत, स्थलांतरित झाले आहेत, मृत झाले आहेत किंवा ज्यांची दुहेरी नोंद आहे, अशा मतदारांची केंद्रनिहाय यादी तयार करून ती मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पंचायत समिती, सर्व महानगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

            लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक विभागाचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या भागात येणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) अचूक माहिती देऊन संपूर्ण सहकार्य करावे, आपले गणनाप्रपत्र वेळेत भरून देऊन त्याची रीतसर पोहोच घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.

0000000000

 

 

 


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी

79 व्या स्वातंत्र्यदिनासाठी राजशिष्टाचार जारी; ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय कार्यक्रम