ठाणे, दि.30 (जिमाका)- लोकसभा निवडणूक 2019 ची सर्व जय्यत तयारी ठाणे जिल्ह्यात सुरु असून जिल्हा निवडणूक यंत्रणा ही सर्व निवडणूक प्रक्रिया शांतता, निर्भयतेच्या वातावरणात व पारदर्शक पणे पार पाडण्यास सज्ज आहे, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. यंदाच्या निवडणूकीत संपुर्ण पणे महिलांद्वारे संचलित केलेली सखी मतदान केंद्रे, दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे संचलित केलेली मतदान केंद्र तसेच मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अधिकाधिक सुविधांची निर्मिती करणे ही वैशिष्ये असतील. जिल्ह्यात मतदार नोंदणी वाढल्याने आधीच्या 6488 मतदान केंद्रांच्या संख्येत 227 मतदान केंद्रांची भर पडणार आहे, असेही यावेळी श्री. नार्वेकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील 23- भिवंडी, 24- कल्याण आणि 25 – ठाणे या तिनही लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी ठाण्याचे अनिल पवार, भिवंडीचे किशन...