पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेअंतर्गत मृग बहारातील चिकू फळपिकासाठी सहभागाकरिता 14 जुलै 2026 अंतिम मुदत

 



ठाणे,दि.7(जिमाका) : सन २०२६-२७ करिता मृग बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे चिकू फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता कृषि विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागाकरिता ३० जून २०२६ अंतिम मुदत होती. तरी सदरील योजनेत सहभागी होणेसाठी केंद्र शासनाने १४ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ दिलेली असून जादा आर्द्रता व जास्त पाऊस या हवामान धोक्यापासून चिकू फळबागांचे संरक्षण करण्यासाठी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री. रामेश्वर पाचे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे यांनी शेतक-यांना केले आहे.

योजनेची वैशिष्टे :-

1) ठाणे जिल्ह्यामध्ये चिकू पिकाकरीता अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव हे महसूल मंडळ अधिसूचित असून त्या महसूल मंडळातील चिकू पिकाच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. 2) कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. 3) खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही या योजना लागू राहील. मात्र भाडेपट्टीनें शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. 4) या योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी 4 हे. मर्यादेपर्यंत राहील. विमा अर्जासोबत फळबागेचा Geo Tagging असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. 5) एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. 6) ही योजना ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी (टोल फ्री नं. १८००४१९५००४) मार्फत राबविण्यात येत आहे. 7) या फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना डिजिटल पीक सर्वेक्षण (Digital Crop Survey (DCS) अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील. 8) विमा योजनेमध्ये विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे. 9) फळपिक विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याचा ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. 10) विमा संरक्षणाचे केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच लागू आहे. विहित वयापेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण केव्हाही संपुष्टात येईल आणि शेतकऱ्याने भरलेला विमा हप्ता जप्त होईल. योजनेत भाग घेण्यासाठी चिकू फळपिकाचे उत्पादनक्षम वय 5 वर्षे आहे. 11) या फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी बंधनकारक आहे.

विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (रु./ हेक्टर) :-

हवामान धोके - जादा आर्द्रता व जास्त पाऊस दि.01 जुलै ते 30 सप्टेंबर, विमा संरक्षित रक्कम प्रति हे.- 7000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 3500/-.

अधिक माहिती करीता शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी / विमा कंपनीशी / कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक १४४४७ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

0000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी

79 व्या स्वातंत्र्यदिनासाठी राजशिष्टाचार जारी; ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय कार्यक्रम