ठाणे जिल्ह्यात ‘माय भारत’ उपक्रमाला गती युवक नोंदणी व स्वयंसेवा अभियानावर विशेष भर
ठाणे, दि.16(जिमाका) : भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या 'MY Bharat' (मेरा युवा भारत)
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा सल्लागार
समितीची (DAC) महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या
अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये जिल्ह्यातील युवक नोंदणी वाढवणे,
विविध स्वयंसेवा उपक्रम राबवणे आणि वर्ष २०२६-२७ या कालावधीसाठीच्या सर्वसमावेशक कृती आराखड्यावर सविस्तर व सखोल चर्चा करण्यात
आली.
या महत्त्वपूर्ण
बैठकीला ठाणे जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी संदीप जिजाबाई लालजी पाटील, ठाणे जिल्हा
क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, प्रकल्प संचालक कार्यालयातील प्रतिनिधी बाचोटीकर
मुनिर, एनसीसीचे नोडल ऑफिसर कॅप्टन बिपीन एस. धुमाल, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन अधिकारी रविंद्र स. मोरे, रेडक्रॉसचे प्रतिनिधी आर. ए. कडवे, ठाणे असिस्टंट
स्किल डेव्हलपमेंट ऑफिसचे माहिदीपसिंग चौहान, स्काऊट अँड गाईड ठाणे येथील हेमांगी सुनील
पाटील, ठाणे लीड बँकेचे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर अभिषेक पवार तसेच ठाणे एन.एस.एस. सेलचे
जीवन विचारे व निरज मिश्रा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान
प्रामुख्याने वर्ष २०२६-२७ साठीच्या धोरणात्मक कृती आराखड्याला (Strategic Action Plan) मंजुरी देण्याबाबत
विचारमंथन झाले. त्याचप्रमाणे 'MY Bharat' या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या विविध
नाविन्यपूर्ण संधी, नियोजित उपक्रम आणि सध्याच्या युवक नोंदणीचा सविस्तर आढावा घेण्यात
आला. जिल्ह्यातील युवकांची या पोर्टलवरील नोंदणी वेगाने वाढवण्यासाठी कोणती प्रभावी
धोरणे राबवता येतील, यावर उपस्थित सर्व सदस्यांनी आपापली मते मांडली आणि युवकांचा सक्रिय
सहभाग वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा सूचना केल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी
बैठकीत मार्गदर्शन करताना सर्व संबंधित विभागांनी 'MY Bharat' उपक्रमामध्ये अत्यंत
सक्रियपणे सहभागी होण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील युवक नोंदणी आणि स्वयंसेवा अभियानाला
अधिक गतिमान करण्यासाठी सर्व विभागांनी आपापसातील समन्वय वाढवणे गरजेचे असल्याचे सांगत
अधिकाधिक युवकांना या डिजिटल पोर्टलशी जोडण्यावर विशेष भर देण्याचे आदेश त्यांनी दिले.
या उपक्रमाचा भाग म्हणून ठाणे
जिल्ह्यात १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत
एक विशेष नोंदणी व व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या विशेष अभियानांतर्गत
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र
सेना (NCC), नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS), स्थानिक युवा मंडळे तसेच प्रामुख्याने
१५ ते २९ वयोगटातील युवकांनी मोठ्या संख्येने आपली नोंदणी
करून सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या 'MY Bharat' पोर्टलच्या
माध्यमातून युवकांना स्वयंसेवा, कौशल्य विकास, विशेष प्रशिक्षण, विविध स्पर्धा, शिबिरे,
समुदाय सेवा आणि शासनाचे अधिकृत ई-प्रमाणपत्र यांसारख्या अनेक सुवर्णसंधी एकाच छताखाली
उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
००००००००००
.jpeg)
Comments
Post a Comment