जागतिक कृषी दिनानिमित्त दहागाव येथे सेंद्रिय शेती प्रात्यक्षिक व वृक्षलागवड माविम आणि 'आत्मा'चा संयुक्त उपक्रम

 



 

ठाणे,दि.02(जिमाका) :- महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, ठाणे स्थापित समृद्धी लोकसंचलित साधन केंद्र, शहापूर यांच्या वतीने दहागाव येथे जागतिक कृषी दिनाचे औचित्य साधून आयएफएडी (IFAD) सहाय्यित जेन्डर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम (GTM) प्रकल्पांतर्गत सेंद्रिय शेती प्रात्यक्षिक व वृक्षलागवड कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये समृद्धी लोकसंचलित साधन केंद्राच्या एकूण 20 महिला लाभार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत शाश्वत शेतीचे धडे गिरवले.

            या प्रसंगी उपस्थित महिला व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना 'आत्मा' शहापूरचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जितेश खांडगे यांनी सेंद्रिय शेतीचे मानवी जीवन आणि जमिनीच्या आरोग्यासाठी असणारे महत्त्व सविस्तरपणे पटवून दिले. त्यांनी केवळ तात्विक माहिती न देता शेतात प्रत्यक्ष जीवामृत तयार करणे, कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनवणे आणि खताचा उत्तम पर्याय म्हणून वर्मी कंपोस्ट (गांडूळ खत) तयार करण्याच्या शास्त्रीय पद्धतींचे थेट प्रात्यक्षिक करून दाखविले. उपस्थित महिला आणि शेतकऱ्यांनी या सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेतली.

            कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माविम ठाणेचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे, जिल्हा प्रकल्प सल्लागार, हेमंत पाटील, सीएमआरसी (CMRC) अध्यक्षा ज्योती जाधव, साधन केंद्राच्या व्यवस्थापक सविता लिंगायत आणि उपजीविका सल्लागार जगदीश दिनकर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रासायनिक शेतीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अधिकाधिक अवलंब करून शाश्वत शेतीला चालना देण्याचे आवाहन केले, तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक शेतकऱ्याने वृक्षलागवड करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

            यावेळी मान्यवर आणि ग्रामस्थांच्या हस्ते गावात वृक्षलागवड करून पर्यावरण संरक्षणाचा मोलाचा संदेश देण्यात आला. या संपूर्ण उपक्रमामुळे परिसरातील महिला बचतगट सदस्य आणि शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती व पर्यावरण रक्षणाबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली असून, ग्रामीण भागाच्या आर्थिक व कृषी विकासात अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित झाले. या यशस्वी कार्यक्रमासाठी परिसरातील महिला बचतगटांच्या सदस्या, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी

79 व्या स्वातंत्र्यदिनासाठी राजशिष्टाचार जारी; ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय कार्यक्रम