"रोजगार महाकुंभ 2026" ठाणे जिल्ह्यात 43 ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन
ठाणे,दि.29(जिमाका)
: महाराष्ट्र शासनाच्या
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत "युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती"
या संकल्पनेला अनुसरून ठाणे जिल्ह्यात भव्य "रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह"
(रोजगार महाकुंभ) चे आयोजन करण्यात आले. या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत कोकण विभागात
एकाच दिवशी आणि एकाच वेळी तब्बल 224 ठिकाणी रोजगार मेळावे होत असून, ठाणे जिल्ह्यात
43 ठिकाणी ‘रोजगार महाकुंभा’चा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ.
श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा रोजगार व कौशल्य
विकास अधिकारी रविंद्र मोरे व अन्य मान्यवरांसह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
कोपरी येथील रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ रोजगार प्रशिक्षण
केंद्रात आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थितांना
मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपल्या मार्गदर्शनात युवकांनी
या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ठाणे जिल्ह्यातील सुशिक्षित
बेरोजगार, नोकरी इच्छुक युवक-युवती तसेच रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांना त्यांच्या
नजीकच्या परिसरातच विविध नामांकित कंपन्या व आस्थापनांमधील रोजगाराच्या संधी उपलब्ध
करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या रोजगार महाकुंभामध्ये विविध क्षेत्रांतील उद्योग व आस्थापना
मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. उपलब्ध रिक्त पदांनुसार उमेदवारांची थेट निवड
प्रक्रिया, मुलाखती आणि प्लेसमेंटची कार्यवाही केली जात असल्याने युवकांना एकाच छताखाली
विविध रोजगाराची दारे खुली झाली आहेत. या उपक्रमामुळे युवक आणि उद्योग यांच्यातील थेट
संवाद वाढीस लागून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत
आहेत. तसेच, युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास प्रोत्साहन देणे
आणि त्यांच्या कौशल्यांना उद्योगांच्या बदलत्या गरजांशी जोडणे, यावरही विशेष भर दिला
जात आहे.
यावेळी आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनीही आपले मनोगत
व्यक्त करताना आजची युवा पिढी ही आपल्या देशाची खरी संपत्ती असल्याचे सांगितले. तरुणांनी
अधिकाधिक कौशल्य आत्मसात करून सर्व प्रकारच्या कामांमध्ये निपुण होण्याचे आवाहन केले.
या राज्यव्यापी ‘रोजगार महाकुंभा’चे राज्यस्तरीय अधिकृत उद्घाटन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता
व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,
राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अपर मुख्य
सचिव मनीषा वर्मा, राज्यभरातून ऑनलाईन व प्रत्यक्ष प्रणालीद्वारे हजारो विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ संदेशाव्दारे
रोजगार मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवक, उद्योग आणि शासन यांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा उपक्रम
युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ठाणे जिल्ह्याीतल रोजगार
मेळाव्याची सद्यस्थिती (अद्ययावत आकडेवारी):
एकूण नोंदणीकृत उमेदवार-8937, सहभागी उद्योजक-156, उपलब्ध
रिक्त पदे-१४,५२४
ठाणे जिल्ह्यातील अधिकाधिक जास्तीत जास्त युवक-युवतींनी या रोजगार महाकुंभात
सहभागी होऊन उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून
करण्यात आले आहे.
0000000000
.jpeg)

Comments
Post a Comment