जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे येथे कामगार नेते आणि मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांची 93 वी जयंती साजरी
ठाणे, दि.28(जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे येथे मराठा आरक्षणाचे आद्यप्रणेते, कामगार नेते आणि मराठा क्रांतीसूर्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची 93 वी जयंती मोठ्या उत्साहात व आदराने साजरी करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आयोजित विशेष चर्चासत्रात स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक व राजकीय जीवनकार्यावर, विशेषतः कामगारांचे हक्क आणि मराठा समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानावर सखोल चर्चा करण्यात आली.
उपस्थित अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा व ध्येयाचा वारसा पुढे चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल."
या कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे कर्मचारी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे शैला शिंदे व शुभम शिंदे हे समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तरुणांना सक्षम करण्याचा संकल्प करून करण्यात आली.
00000000

Comments
Post a Comment