कोपरखैरणेत ‘इच्छापूर्ती’ व ‘सुखकर्ता’च्या दरबारात ‘लोकसंवाद’चे प्रभावी पर्व जिल्हा माहिती कार्यालय, अग्रणी बँक, कौशल्य विकास, पोलीस व महिला-बालविकास यंत्रणेच्या ‘टीमवर्क’चे नागरिकांकडून भरभरून कौतुक

 




ठाणे,दि.24(जिमाका) : सार्वजनिक गणेशोत्सवाची सामाजिक ऊर्जेची परंपरा जपत शासकीय योजना थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा एक अत्यंत गतिमान व परिणामकारक उपक्रम नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे प्रत्यक्षात उतरला. जिल्हा प्रशासन, माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत कार्यरत असलेले ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रोजगार स्वयंरोजगार कौशल्य विकास विभाग, पोलीस विभाग आणि ठाणे जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकसंवाद’ अभियानाने कोपरखैरणे परिसरातील दोन प्रमुख गणेशोत्सवांमध्ये यशस्वी दुहेरी कार्यक्रम संपन्न झाले.

            जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कुशल व दूरदर्शी मार्गदर्शनाखाली हा व्यापक प्रबोधनपर उपक्रम पार पडला. एकाच छताखाली विविध प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येत साधलेल्या या संवादाने नागरिकांना शासकीय योजनांचे कवच आणि समृद्धीची नवी दिशा दाखवली असून, दोन्ही ठिकाणी भाविक, स्थानिक रहिवासी आणि महिला वर्गाने या अनोख्या प्रयत्नाबद्दल मनस्वी समाधान व्यक्त केले आहे.

            या अभियानांतर्गत पहिले विशेष सत्र ‘मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, कोपरखैरणे’ अर्थात ‘कोपरखैरणेचा इच्छापूर्ती गणपती’ येथे आयोजित करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्री. ऋषिकेश शिवाजी पालवे, उपाध्यक्ष श्री. हितेश हरिदास पाटील, सचिव श्री. किरण राजाराम पाटील तसेच श्री. शंकर संगपाळ व श्री. शुभम शिंदे यांच्या सक्रिय सहकार्याने आणि उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

            यानंतर दुसरे स्वतंत्र सत्र ‘कोपरखैरणेचा सुखकर्ता’ या नामांकित गणेशोत्सव मंडळात संपन्न झाले. येथे मंडळाचे अध्यक्ष श्री. विशाल सावंत, उपाध्यक्ष श्री. प्रवीण गाडेकर, सचिव श्री. सुशील आरकडे, श्री. अविनाश मुरुम, श्री. सुरज शेवाळे, शंकर संगपाळ आणि श्री. शुभम शिंदे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि परिसरातील भाविकांनी या लोकसंवाद शिबिराचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

            यावेळी महिलांचा आणि युवा कार्यकर्त्यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर व मुख्य भाषणात जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज सानप यांनी ‘लोकसंवाद’ उपक्रमाची व्यापक संकल्पना उलगडून दाखवली. शासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दरी मिटवून थेट संवादातून कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवणे हाच या मोहिमेचा मूळ हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर महिला व बालविकास विभागाचे महिला संरक्षण अधिकारी श्री. कमलेश देशमुख यांनी महिला आणि बालकांसाठी असलेल्या सुरक्षाविषयक कायद्यांवर व योजनांवर अत्यंत विस्तृत मार्गदर्शन केले. संकटग्रस्त बालकांच्या सुरक्षिततेसाठी राबविली जाणारी ‘मिशन वात्सल्य’ योजना, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि महिलांच्या आत्मसन्मानाचे रक्षण करणाऱ्या ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा’ याविषयी त्यांनी सोप्या व आत्मीय भाषेत माहिती दिली. महिलांनी व कुटुंबांनी या योजनांचे लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

            केवळ एका विषयापुरते मर्यादित न राहता प्रशासकीय यंत्रणेने सर्वस्पर्शी विषयांची मांडणी येथे केली. ठाणे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. अभिषेक पवार यांनी दैनंदिन जीवनातील डिजिटल साक्षरतेवर भर देत ऑनलाइन व्यवहार सुरक्षित कसे ठेवावेत, याविषयी बहुमूल्य माहिती दिली. तर पोलीस उपनिरीक्षक श्री. मोरे यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी, सायबर फ्रॉड टाळण्याचे उपाय आणि सायबर सुरक्षिततेचे नियम समजावून सांगितले. रोजगार व कौशल्य विकास विभागाच्या वतीने श्री. शुभम शिंदे यांनी तरुणांसाठी महा रोजगार कुंभ आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधींचे दालन उलगडले.   

            यासोबतच या संपूर्ण लोकसंवादाच्या कार्यक्रमांमध्ये पर्यावरण अभ्यासक श्री. विजयकुमार कट्टी यांनी पर्यावरण संवर्धनाची काळाची गरज अधोरेखित करत सण-उत्सव साजरे करताना निसर्गाचे रक्षण कसे करावे, यावर मौलिक विचार मांडले.

            जिल्हा माहिती कार्यालय, बँक प्रशासन, पोलीस यंत्रणा, महिला-बालविकास आणि पर्यावरण क्षेत्र अशा विविध घटकांनी एकत्र येऊन दाखवलेले हे एकसंध ‘टीमवर्क’ या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले. ज्या योजनांची माहिती थेट मिळत नाही, ती सर्व माहिती थेट बाप्पाच्या दर्शनावेळी, एकाच ठिकाणी आणि थेट अधिकाऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळाल्याने दोन्ही मंडळांतील भाविकांनी व महिलांनी अत्यंत आनंद व्यक्त केला.

            शासकीय विभाग जर अशाच समन्वयाने थेट जनतेत उतरले, तर योजनांचा लाभ १०० टक्के गरजूंपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करत कोपरखैरणेकरांनी या संपूर्ण ‘लोकसंवाद’ चमूचे टाळ्यांच्या गजरात आभार मानले.

0000000000



Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट