"शिव समर्थ गणेशोत्सव" आणि "विघ्नहर्ता गणेशोत्सव" मंडळाच्या व्यासपीठावरून घडला अविस्मरणीय "लोकसंवाद" विविध प्रशासकीय विभागांच्या एकसंध 'टीमवर्क'मधून शेती, रोजगार, पर्यावरण व महिला-बालकल्याण योजनांचा थेट जागर

 




 

ठाणे,दि.24(जिमाका) : समाजप्रबोधन आणि प्रशासकीय पारदर्शकता एकत्र आणीत सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा ‘लोकसंवाद’ हा अभिनव उपक्रम अंबरनाथ शहरात मोठ्या दिमाखात पार पडला.

            जिल्हा प्रशासन, माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत कार्यरत ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या बहुआयामी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या दूरदर्शी व कुशल मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या लोकसंवाद उपक्रमात विविध शासकीय विभागांचे अधिकारी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि त्यांनी गणेश मंडपात थेट नागरिकांशी आत्मीय संवाद साधला. प्रशासनाने स्वतः लोकांच्या दारात येऊन राबविलेल्या या आदर्श ‘टीमवर्क’मुळे उपस्थित भाविक, महिला आणि युवकांनी मनापासून समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.

            कार्यक्रमाची सुरुवात करताना जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज सानप यांनी ‘लोकसंवाद’ या संकल्पनेचे महत्त्व विषद केले. शासन आणि जनता यांच्यातील दरी मिटवून थेट संवादातून शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हाच या मोहिमेचा मूळ उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण पिढीला दिशादर्शन करत त्यांनी माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रत्यक्ष कामकाज, शासनाच्या अधिकृत माहितीचे स्रोत आणि युवकांसाठी उपलब्ध असलेल्या संधी याविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.    त्यांच्या या व्याख्यानाने उपस्थित तरुणांना प्रशासकीय सेवेविषयी नवी प्रेरणा मिळाली.

            स्थानिक पातळीवरील नागरी विकासाचा लेखाजोखा मांडताना अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. कमलेश भुजबळ यांनी नगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध नागरी सुविधा, लोककल्याणकारी योजना आणि नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी एकाच छताखाली सोडविणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’ची सविस्तर माहिती दिली. याशिवाय बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘महा रोजगार कुंभ’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची माहिती देत तरुणांनी यात मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

            कार्यक्रमात महिला सक्षमीकरण आणि बालसुरक्षेचा विषय अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला. महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी श्रीमती वर्षा यादव आणि श्री. अमर यादव यांनी समाजातील दुर्लक्षित व गरजू घटकांसाठी शासनाने आखलेली संरक्षण चौकट समजावून सांगितली. अनाथ व संकटग्रस्त बालकांच्या पुनर्वसनासाठी असलेली ‘मिशन वात्सल्य’ योजना, माता-भगिनींना आर्थिक स्वावलंबन देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि महिलांच्या सन्मानाचे व सुरक्षिततेचे रक्षण करणारा ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा’’ याविषयी त्यांनी अत्यंत सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले. योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि कार्यपद्धती समजावून दिल्याने उपस्थित महिलांनी विचारलेल्या शंकांचे जागीच निरसन झाले.

            केवळ नागरी योजनांपुरते मर्यादित न राहता, ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांसाठी कृषी अधिकारी श्री. बाळासाहेब माने यांनी कृषी विभागाच्या योजनांचे दालन उलगडले. शेतकऱ्यांसाठी आधुनिक अवजारे, बी-बियाणे, सिंचन आणि अनुदानाच्या शासकीय योजनांची माहिती त्यांनी दिली.

            तर दुसरीकडे, पर्यावरण अभ्यासक श्री. विजयकुमार कट्टी यांनी सण-उत्सव साजरे करताना निसर्गाचा समतोल कसा राखावा, पर्यावरणपूरक जीवनशैली कशी अंगीकारावी आणि भावी पिढीसाठी पर्यावरण संवर्धन का अपरिहार्य आहे, यावर विचारप्रवर्तक मांडणी केली.

            या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक जनता यांच्यात यशस्वी समन्वय साधण्यासाठी अधिस्वीकृतीधारक पत्रकार श्री. शंकर रहाणे यांनी विशेष पुढाकार घेऊन मोलाची मदत केली.

            जिल्हा माहिती कार्यालय, नगरपालिका, कृषी विभाग, महिला व बालविकास विभाग आणि पर्यावरण क्षेत्र अशा विविध घटकांनी एकत्र येऊन दाखवलेले हे एकसंध 'टीमवर्क' उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. ही सर्वसमावेशक माहिती थेट बाप्पाच्या साक्षीने, एकाच व्यासपीठावरून मिळाल्यामुळे परिसरातील महिला, भाविक आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे भरभरून कौतुक केले.

            अंबरनाथमध्ये रंगलेला हा "लोकसंवाद" खऱ्या अर्थाने लोकप्रबोधनाचा आणि प्रशासकीय संवेदनशीलतेचा आदर्श वस्तुपाठ ठरला आहे.

0000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट