ठाणे येथे 09 ऑक्टोबर रोजी जिल्हा गुंतवणूक परिषद 2026 चे आयोजन मुंबई महानगर प्रदेशातील धोरणात्मक स्थान, मजबूत औद्योगिक पाया आणि उत्कृष्ट संपर्क व्यवस्थेच्या बळावर गुंतवणुकीच्या नव्या संधी ठाणे जिथे गुंतवणूकीला संधीची जोड मिळते

 


ठाणे,दि.06(जिमाका) :- जिल्हा गुंतवणूक परिषद 2026 चे आयोजन गुरुवार, दि.09 ऑक्टोवर 2026 रोजी टीप टॉप प्लाझा, रिगल हॉल, एलबीएस मार्ग, मुलुंड चेक नाक्याजवळ, ठाणे (प) येथे करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्याचे मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) धोरणात्मक स्थान, विकसित ओद्योगिक व व्यावसायिक परिसंस्था, उत्कृष्ट संपर्क व्यवस्था, कुशल मनुष्यबळ आणि व्यापक बाजारपेठेपर्यंतची पोहोच यांचा प्रभावी उपयोग करुन नवीन गुंतवणूक आकर्षित करणे, उद्योगांच्या विस्ताराला चालना देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

ही परिषद जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असून, सकाळी 10.30 वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल. या परिषदेस उद्योजक, गुंतवणूकदार, औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध संबंधित भागधारक उपस्थित राहणार आहेत. ही परिषद महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व उद्योग आयुक्त, महाराष्ट्र शासन, डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत प्रमुख मान्यवरांमध्ये विशेष आयुक्त (मैत्री) वैभव वाघमारे, तसेच जिल्हाधिकारी, ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या परिषदेचा उद्देश ठाणे जिल्ह्याची औद्योगिक व गुंतवणूक क्षमता प्रदर्शित करणे तसेच उद्योजक आणि गुंतवणूकदारांना ठाणे जिल्ह्याकडे आकर्षित करणे हा आहे. वाढलेली गुंतवणूक नवीन उद्योगांच्या स्थापनेस, स्थानिक रोजगार निर्मितीस, पूरक व्यवसायांना बळकटी देण्यास आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यास मदत करेल. ठाणे जिल्ह्यात उत्पादन, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान (IT / ITES), लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, औषधनिर्मिती, रसायन उद्योग, हरित तंत्रज्ञान आणि विविध सेवा या सारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. ठाणे जिल्ह्यातील नवीन गुंतवणुकीमुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) चालना मिळण्यास मदत होईल. स्थानिक उद्योग, पूरक व्यवसाय आणि सेवा क्षेत्राचा विस्तार होऊन रोजगाराच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संधी निर्माण होणे अपेक्षित आहे. वाढत्या गुंतवणुकीमुळे स्थानिक पुरवठा साखळी मजबूत होण्यास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल.

या परिषदेमुळे उद्योजक आणि संभाव्य गुंतवणूकदारांना ठाणे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या संधी. औद्योगिक क्षमता आणि विविध क्षेत्रांतील विकासाच्या शक्यता जाणून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे यांच्या वतीने उद्योजक, गुंतवणूकदार आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व संबंधित भागधारकांना या परिषदेस उपस्थित राहून उपलब्ध संधीचा लाभ घेण्याचे आणि ठाणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हा गुंतवणूक परिषद 2026 ही ठाणे जिल्ह्याची ओद्योगिक क्षमता, धोरणात्मक स्थान, बाजारपेठेशी असलेली जोडणी आणि गुंतवणुकीच्या संधी अधोरेखित करणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, असा विश्वास जिल्हा उद्योग केंद्राच्या उप आयुक्त सोनाली देवरे यांनी व्यक्त केला आहे.

00000000000000

 


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन