शहापूर प्रकल्पातर्फे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान 'स्वास्थ्य पोषण सेवा संगम अभियाना'चे आयोजन आदिवासी बांधवांसाठी एकाच छताखाली विविध शासकीय योजना व सेवा उपलब्ध

 



 

ठाणे, दि.16(जिमाका) :- आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर यांच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत 'स्वास्थ्य पोषण सेवा संगम अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील चार प्रमुख बहुउद्देशीय केंद्रांवर विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने आरोग्य तपासणी, पोषण जनजागृती, दाखले व कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, कौशल्यविकास, रोजगाराच्या संधी आणि आदिवासी कल्याण योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

अभियानासाठी निश्चित करण्यात आलेली बहुउद्देशीय केंद्रे

हे अभियान ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील जु-बेहरे (कातकरी वाडी), म्हसकल-घोडाखडक, राया-कलमवाडी आणि पळसोली-वैतागवाडी या चार बहुउद्देशीय केंद्रांवर आयोजित केले जाणार आहे. या सर्व केंद्रांवर विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना थेट सेवा व मार्गदर्शन प्रदान करतील.

महिनाभर राबवले जाणारे दिनांकनिहाय उपक्रम

अभियानाच्या कालावधीत १५ व १६ ऑक्टोबर रोजी आदिवासी विकास विभागामार्फत कल्याणकारी योजनांची माहिती, पात्रता निकष व अर्ज प्रक्रियेबाबत जनजागृती केली जाईल. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान आरोग्य विभागाच्या सहकार्याने सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरवल्या जातील. २० ते २२ ऑक्टोबर दरम्यान महिला व बालविकास विभागामार्फत गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी पोषणविषयक मार्गदर्शन केले जाईल. २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत महसूल व पुरवठा विभागाच्या माध्यमातून आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला व शिधापत्रिका यांसारख्या आवश्यक कागदपत्रांचे अर्ज स्वीकारणे, दुरुस्ती करणे व मार्गदर्शन करण्याचे काम केले जाईल.

तसेच २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या समन्वयाने वनधन विकास केंद्रातील उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीविषयक उपक्रम राबवले जातील. ३० व ३१ ऑक्टोबर रोजी सिकलसेल ॲनिमिया तपासणी व जनजागृती मोहीम राबवली जाईल. १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान पिण्याचे पाणी, वीज व आरोग्य सेवांबाबत माहिती दिली जाईल. ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान कौशल्यविकास, स्वयं-सहायता बचत गट व रोजगाराच्या संधींबाबत युवकांना मार्गदर्शन केले जाईल. ९ ते १४ नोव्हेंबर दरम्यान बालदिनाचे औचित्य साधून बालहक्क, शिक्षण व पोषणाबाबत जनजागृती केली जाईल, तर १५ नोव्हेंबर रोजी अभियानाचा समारोप आदिवासी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि कला प्रदर्शनाने होईल.

अभियानात सहभागी होण्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे आवाहन

या अभियानाचा मुख्य उद्देश आदिवासी कुटुंबांना त्यांच्या घरांजवळ विविध विभागांच्या सेवा उपलब्ध करून देणे आणि पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हा आहे. त्यामुळे कल्याण तालुक्यातील जु-बेहरे, म्हसकल, राया व पळसोली परिसरातील सर्व आदिवासी बांधवांनी आपल्या जवळच्या बहुउद्देशीय केंद्रावर उपस्थित राहून या अभियानाचा व विविध शासकीय सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

000000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन