कापूस उत्पादकता अभियानांतर्गत 19 जिल्ह्यांत 'कापूस श्रेडर'साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे कृषी आयुक्तांचे आवाहन

 

 


 


 

ठाणे,दि.23(जिमाका) :  महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन 2026-27 या वर्षात 'कापूस उत्पादकता अभियान' (कपास कांती) अंमलबजावणीत आणले जात आहे. या अभियानांतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबींमधून 'कापूस श्रेडर' हा महत्त्वाचा घटक राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कापूस उत्पादक 19 जिल्ह्यांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, पात्र घटकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्तांमार्फत करण्यात आले आहे.

योजनेचा विस्तार आणि पात्र लाभार्थी सदर योजना राज्यातील अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या 19 जिल्ह्यांमध्ये राबविली जात आहे. कापूस श्रेडर या घटकाचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी अथवा संस्था, तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहकारी संस्था पूर्णपणे पात्र आहेत.

अनुदानाचे स्वरूप आणि निवड प्रक्रिया या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना कापूस श्रेडरच्या एकूण किमतीच्या 50 टक्के अथवा कमाल 75,000/- रुपये (यांपैकी जे कमी असेल ते) अनुदान देय राहील. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना किमतीच्या 40 टक्के अथवा कमाल 60,000/- रुपये इतके अनुदान मंजूर केले जाईल. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (FCFS) या तत्त्वावर केली जाणार असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया आणि संपर्क या घटकाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांनी व संस्थांनी महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी संबंधित विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000000000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन