गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि संस्कृतीच्या जतनासाठी ‘दुर्गोत्सव 2026’ उपक्रमाचे आयोजन

 


ठाणे,दि.21(जिमाका) : महाराष्ट्राची समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शौर्यपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने तसेच गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी आगामी दिवाळीच्या सुट्टीत ‘दुर्गोत्सव 2026’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना आपल्या घरी, गृहसंकुलात, शैक्षणिक परिसरात अथवा उपलब्ध मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून सहभागी होता येणार आहे. या उपक्रमासाठी 5 ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.

युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सन 2025 मध्ये ‘Maratha Military Landscapes of India’ या नामांकनांतर्गत महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमाला विशेष सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून, राज्यातील नागरिकांनी आपल्या वारशाचे जतन करण्यासाठी या मोहिमेत हिरिरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहभागाची कार्यपद्धती आणि पडताळणी प्रक्रिया दुर्गोत्सवात सहभागी होण्यास उत्सुक असलेल्या नागरिकांनी [https://www.amrutdurgotsav.com/](https://www.amrutdurgotsav.com/) या अधिकृत संकेतस्थळावर आपली नोंदणी पूर्ण करावयाची आहे. सहभागींनी स्वतः तयार केलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीसोबत आपला फोटो अथवा सेल्फी काढून तो नोंदणी अर्जातील अचूक वैयक्तिक व संपर्क माहितीसह संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या सर्व नोंदण्यांची व छायाचित्रांची संबंधित संस्थेमार्फत प्राथमिक पडताळणी करण्यात येईल. पडताळणीअंती नोंदणी वैध आढळल्यास सहभागींना डिजिटल स्वरूपातील अधिकृत ‘अभिनंदन पत्र’ प्रदान केले जाईल.

नियम, सुरक्षा आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर उपक्रमात सहभागी होण्यासाठी किल्ल्याची प्रतिकृती ही स्वतः तयार केलेली असणे अनिवार्य आहे. इंटरनेट अथवा सोशल मीडियावरून घेतलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ अपलोड केल्यास संबंधित नोंदणी अमान्य करण्यात येईल. तसेच सादर केलेल्या छायाचित्रात सहभागी व्यक्ती आणि प्रतिकृती स्पष्ट दिसणे बंधनकारक आहे. सार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग, अग्निशमन आपत्कालीन मार्ग किंवा सार्वजनिक वापराच्या जागांवर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. या निर्माणकार्यात नागरिकांनी मुख्यत्वे पर्यावरणपूरक आणि सुरक्षित साहित्याचा वापर करावा.

सर्वसमावेशक सहभाग आणि प्रशासकीय आवाहन या उपक्रमात जगातील कोणतीही व्यक्ती, कुटुंब, सामाजिक संस्था, गृहसंकुल, शैक्षणिक संस्था किंवा गट सहभागी होऊ शकतात. हा सहभाग पूर्णपणे ऐच्छिक स्वरूपाचा असून, देण्यात येणारे डिजिटल अभिनंदन पत्र हे केवळ सहभागाची अधिकृत नोंद म्हणून दिले जाईल. यातून कोणताही आर्थिक लाभ, रोख पारितोषिक अथवा कायदेशीर हक्क निर्माण होणार नाहीत. या उपक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख व्हावी आणि गड-संवर्धनाची भावना वृद्धिंगत व्हावी, याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अमृत’च्या ठाणे जिल्हा उपव्यवस्थापक श्रीमती माया रत्नपारखी-खेत्रे यांनी केले आहे.

0000000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन