उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 25 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी पायाभूत साक्षरता व संख्यावान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा आयोजन व पार्श्वभूमी
ठाणे,दि.16(जिमाका) :- केंद्र शासन
पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यातील असाक्षर व्यक्तींसाठी
रविवार, दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत पायाभूत
साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून सुमारे 7 लक्ष परीक्षार्थी प्रविष्ट होणे अपेक्षित
आहे. सदर परीक्षेच्या पूर्वतयारीचा आणि नियोजनाचा आढावा घेण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर
2026 रोजी शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता
अभियान प्राधिकरण, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (योजना)
व त्यांच्या अधिनस्थ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, परीक्षा
सुरळीतपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
परीक्षेचे स्वरूप, माध्यम व पात्रता
ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी,
गुजराती, उर्दू, कन्नड, तेलगू, तामिळ आणि बंगाली अशा एकूण 9 भाषांच्या माध्यमातून घेतली
जाईल. या परीक्षेसाठी 15 किंवा अधिक वयाची नोंदणीकृत असाक्षर व्यक्ती पात्र राहील.
परीक्षेचा एकूण गुणांकन आराखडा 150 गुणांचा असून, यात वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या
प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी 50 गुण निर्धारित करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष पेपरचा
कालावधी 3 तासांचा असेल, तर दिव्यांग परीक्षार्थ्यांसाठी 60 मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात
येणार आहे.
परीक्षा केंद्र, कागदपत्रे व मूल्यमापन प्रक्रिया
ज्या शाळांमधून असाक्षरांची ऑनलाइन
नोंदणी झाली आहे, ती प्रत्येक शाळा अंमलबजावणी एक अर्थात परीक्षा केंद्र म्हणून कार्यरत
राहील. परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना स्वतःचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड
/ मतदान ओळखपत्र / बँक पासबुक यापैकी कोणतेही एक कागदपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.
परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी शाळा स्तरावरच केली जाईल आणि त्यांचे मूल्यांकनाचे
गुण उल्लास पोर्टलवर ऑनलाइन भरले जातील.
शिक्षणाच्या मूळ प्रवाहात दाखल
होण्याची संधी
ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर
राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था (NIOS) किंवा राज्य मुक्त विद्यालयीन मंडळ
(SIOS) यांच्या माध्यमातून इयत्ता 3 री, 5 वी, 8 वी, 10 वी व 12 वीची परीक्षा देऊन
नवसाक्षर हे शिक्षणाच्या मूळ प्रवाहात दाखल होऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त असाक्षरांनी
नजीकच्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत नोंदणी करावी आणि या परीक्षेला उपस्थित राहून
साक्षरतेचे प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य,
पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
000000000000
Comments
Post a Comment