ठाणे जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण; दावे व हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे नागरिकांना आवाहन
ठाणे,दि.16(जिमाका) :- भारत
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) या उपक्रमांतर्गत सुधारित वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल
करण्याची मुदत २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सुधारित मुदतीनंतर
अंतिम मतदार यादी पूर्वघोषित वेळापत्रकाप्रमाणेच दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी
प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
गैरहजर, स्थलांतरित किंवा
इतर कारणांमुळे ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होऊ शकले नाही, त्यांना
त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी मतदार यादीत नव्याने नाव
नोंदवण्याची संधी या कालावधीत उपलब्ध झाली आहे. याशिवाय, ऑक्टोबर २०२४ नंतर मतदार
यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात न आल्याने १ ऑक्टोबर २०२४ नंतर १८ वर्षे
पूर्ण झालेल्या नवमतदारांना नाव नोंदवता आले नव्हते. आता दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी
किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र नवमतदारांना मतदार यादीत नाव
समाविष्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
या सुधारित कार्यक्रमानुसार
नवमतदार, तसेच अन्य पात्र नागरिक ज्यांची नावे प्रारूप मतदार यादीत नाहीत, त्यांना
नवीन नाव नोंदणी, नोंदणीतील दुरुस्ती तसेच नावे वगळण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ ते २६
ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती सादर करता येतील.
सर्व १८ विधानसभा
मतदारसंघांत विशेष शिबिरांचे आयोजन
या मोहिमेचा भाग म्हणून ठाणे
जिल्ह्यातील सर्व १८ विधानसभा मतदारसंघांतील निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर व
पदनिर्देशित ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे दि. १७, १८,
२४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ या शनिवारी व रविवारी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या
वेळेत पार पडतील.
या शिबिरांमध्ये नागरिकांना
आवश्यक घोषणेसह व पुराव्यांसह अर्ज सादर करता येतील. नवीन नाव नोंदणीसाठी नमुना-६, नाव
वगळणीसाठी नमुना-७ आणि नोंदींमधील दुरुस्तीसाठी नमुना-८ उपलब्ध
करून देण्यात आले आहेत. शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित
राहणार असून, सर्व राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनीही (BLA)
उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेत महिला व दिव्यांग
नागरिकांच्या नाव नोंदणीस विशेष प्राधान्य दिले जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्व पात्र
नागरिकांनी व नवमतदारांनी या विशेष मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली नाव
नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
0000000000000
Comments
Post a Comment