आंबा फळपिक विमा योजना: ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे,दि.9(जिमाका) :- सन २०२६-२७ करीता आंबिया बहरामध्ये विविध हवामान धोक्यांमुळे
आंबा फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक आधार मिळावा, यासाठी कृषी
विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या
योजनेत सहभागाकरिता पिक विमा संकेतस्थळावर अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबरपासून सुरुवात
झाली असून, ३० नोव्हेंबर २०२६ ही अंतिम मुदत
आहे. आंबा फळबागांचे अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, वेगाचा वारा आणि गारपीट या
हवामान धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी
व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे श्री. रामेश्वर पाचे यांनी
केले आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
1. क्षेत्र व पात्रता: ठाणे जिल्ह्यामध्ये
अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा पिकाच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण
देण्यात येईल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल.
2. कुळ व भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरी:
खातेदार शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुळ व भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही
योजना लागू राहील. मात्र, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या, शेतकऱ्यास नोंदणीकृत
(रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.
3. क्षेत्र मर्यादा: कोकण विभागाकरिता एका
फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हेक्टर) अशी मर्यादा
राहील. तसेच, जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून
प्रति शेतकरी ४ हेक्टरपर्यंत राहील. विमा अर्जासोबत फळबागेचा जिओ टॅगिंग (Geo
Tagging) असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे.
4. बहार मर्यादा: एका फळपिकासाठी एका
वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहरापैकी कोणत्याही एकाच बहाराकरिता विमा
संरक्षणासाठी अर्ज करता येईल.
5. विमा कंपनी: ठाणे जिल्ह्यामध्ये ही
योजना ‘भारतीय विमा कंपनी लि.’ मार्फत राबविण्यात येत आहे.
6. ई-पिक पाहणी: सदर फळपिक विमा योजनेत
सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे.
7. बँक खाते: विमा योजनेमध्ये नुकसान
भरपाईची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार-आधारित पेमेंटसाठी लिंक असणे
आवश्यक आहे.
8. उत्पादनक्षम वय: या योजनेत भाग
घेण्यासाठी आंबा फळपिकाचे उत्पादनक्षम वय ५ वर्षे असणे गरजेचे आहे. विहित
वयापेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्यास, पडताळणीत
निदर्शनास आल्यास विमा संरक्षण केव्हाही संपुष्टात येईल आणि शेतकऱ्याने भरलेला
विमा हप्ता जप्त केला जाईल.
विमा संरक्षित रक्कम व विमा
हप्ता (प्रति हेक्टर):
·
हवामान धोके: अवेळी
पाऊस, कमी/जास्त तापमान, वेगाचा वारा आणि गारपीट.
·
विमा संरक्षित रक्कम:
१,७०,०००/- रुपये प्रति हेक्टर.
·
विमा हप्ता (शेतकरी हिस्सा): ८,५००/-
रुपये प्रति हेक्टर.
अतिवृष्टी, अवेळी पाऊस व इतर
हवामान बदलांमुळे होणाऱ्या नुकसानापासून सुरक्षितता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी
मुदतीपूर्वी आपला विमा अर्ज दाखल करावा. अधिक माहितीकरिता नजीकच्या तालुका कृषी
अधिकारी कार्यालयाशी अथवा संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे यांच्याकडून करण्यात आले आहे.
00000000000
Comments
Post a Comment