उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी राज्यभरात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीचे आयोजन सुमारे 7 लक्ष परीक्षार्थी प्रविष्ट होण्याचा अंदाज; शिक्षण संचालनालयाकडून तयारीचा आढावा पूर्ण
ठाणे,दि.23(जिमाका) : केंद्र शासन पुरस्कृत 'उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम' अंतर्गत
महाराष्ट्रात असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन
चाचणी (FLNAT) परीक्षेचे आयोजन रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. ही
परीक्षा सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पार पडणार असून संपूर्ण राज्यातून सुमारे 7 लक्ष
परीक्षार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होणे अपेक्षित आहे.
परीक्षेच्या
पूर्वतयारीचा आणि नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी शिक्षण संचालक (योजना),
महाराष्ट्र राज्य तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, पुणे यांच्या
अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (योजना) आणि त्यांच्या अधिनस्थ
क्षेत्रीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये परीक्षा
अत्यंत पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रीय
अधिकाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
परीक्षेची रूपरेषा आणि प्रमुख नियम
:
सदर
परीक्षेसाठी १५ वर्षे
किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नोंदणीकृत व्यक्ती पात्र ठरणार आहेत. हे पेपर एकूण
१५० गुणांचे असून त्यांची विभागणी वाचन (५० गुण), लेखन (५० गुण) आणि संख्याज्ञान
(५० गुण) अशा तीन भागांत करण्यात आली आहे. प्रत्यक्ष पेपर सोडवण्यासाठी ३ तासांचा
कालावधी देण्यात आला असून दिव्यांग परीक्षार्थ्यांसाठी ६० मिनिटांचा जादा वेळ मंजूर करण्यात
आला आहे.
परीक्षेचे
माध्यम मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलगू, तामिळ आणि बंगाली
अशा एकूण 9 भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्या शाळांमधून असाक्षरांची ऑनलाइन
नोंदणी पूर्ण झाली आहे, ती प्रत्येक शाळा या परीक्षेसाठी 'अंमलबजावणी एकक' म्हणजेच
परीक्षा केंद्र म्हणून कार्य करेल. परीक्षार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी स्वतःचे
आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा बँक पासबुक यांपैकी एक वैध ओळखपत्र सोबत आणणे
अनिवार्य राहील.
मूल्यांकन आणि पुढील शैक्षणिक संधी
:
परीक्षा
संपन्न झाल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी शाळा स्तरावरच पूर्ण केली जाईल आणि
मिळालेल्या गुणांची नोंद उल्लास पोर्टलवर ऑनलाइन स्वरूपात केली जाईल. ही परीक्षा
यशस्वीरीत्या उत्तीर्ण करणाऱ्या नवसाक्षरांना एनआयओएस (NIOS) किंवा एसआयओएस (SIOS)
च्या माध्यमातून इयत्ता ३
री, ५ वी, ८ वी, १० वी आणि १२
वी च्या परीक्षा देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची सुवर्णसंधी
प्राप्त होणार आहे.
असाक्षरांनी शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या शाळेच्या
मुख्याध्यापकांमार्फत त्वरित नोंदणी करावी आणि या कार्यक्रमांतर्गत साक्षर व्हावे,
तसेच राज्यातील जास्तीत जास्त नवसाक्षरांनी या परीक्षेला उपस्थित राहून साक्षरतेचे
अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र
राज्य, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0000000000000
Comments
Post a Comment