"सेवा संकल्प" अभियानांतर्गत 9 पथकांमार्फत शहापूर तालुक्यातील गावे, वाड्या-वस्त्यांवर थेट लाभार्थ्यांच्या दारी पोहोचणार महसूल प्रशासन आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते घरपोच लाभ वाटप योजनेचा उत्साहात शुभारंभ
ठाणे,दि.17(जिमाका): नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ थेट
त्यांच्या घरापर्यंत सहज आणि विनाविलंब मिळावेत, या मुख्य उद्देशाने राबविल्या जात
असलेल्या 'सेवा संकल्प' अभियानांतर्गत घरपोच लाभ वाटप योजनेचा शुभारंभ आमदार दौलत दरोडा
यांच्या शुभहस्ते नुकताच उत्साहात पार पडला.
या अभियानाच्या माध्यमातून महसूल व वन विभागाच्या विविध कल्याणकारी
योजनांची प्रभावी प्रचार-प्रसिद्धी केली जात असून, प्रशासकीय यंत्रणा स्वतः गावागावांत
जाऊन नागरिकांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देत आहे.
'सेवा संकल्प' अभियान हे केवळ एक उपक्रम नसून, ते प्रशासनाला थेट जनतेशी
जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना विविध
शासकीय दाखले, ७/१२ उतारे व इतर सेवा मिळवण्यासाठी शासकीय
कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने हे विशेष पाऊल
उचलले आहे.
या अभियानांतर्गत मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) हे
प्रत्यक्ष गावात जाऊन पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ सुपूर्द करत आहेत. यामुळे
नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचत असून, प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत आहे.
अभियानादरम्यान भूमी अभिलेख व महसूलविषयक कामांसाठी महत्त्वाचे ७ ई व १२ ई उतारे थेट लाभार्थ्यांना दिले
जात आहेत. तसेच जमिनींच्या नोंदींमधील अटी व शर्थींनुसार बदल केलेले ४३ शर्थ कमी केलेले
अद्ययावत ७/१२ उतारे सुपूर्द केले जात आहेत. याशिवाय, परिसरातील १५ महाविद्यालयांमध्ये
जाऊन विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे जातीचे दाखले, उत्पन्न दाखले व अधिवास (डोमिसाईल)
दाखले वितरीत केले जात आहेत. प्रलंबित वारस नोंदी पूर्ण करून सुधारित ७/१२ उतारे देण्यासोबतच, शेतातील पानंद रस्त्यांचे
महत्त्व, त्यांची उपलब्धता व कायदेशीर बाबींविषयी विशेष जनजागृती करून वाटप केले जात
आहे.
हे अभियान अत्यंत वेगाने आणि पारदर्शकतेने राबवण्यासाठी मंडळनिहाय
९ विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके येत्या सोमवारपर्यंत शहापूर तालुक्यातील
प्रत्येक गावात, वाडीवर आणि वस्तीवर जाऊन पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणार
आहेत.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पंचाळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली
हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवले जात आहे. या उपक्रमाच्या यशस्वी
अंमलबजावणीसाठी अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप
माने आणि तहसिलदार (सामान्य प्रशासन) सचिन चौधर यांच्या नियोजन व सहकार्यातून अभियानाला
मोठी गती मिळाली आहे. त्याचप्रमाणे, शहापूर तालुक्यात प्रांताधिकारी अमित सानप आणि
तहसिलदार परमेश्वर कासुळे यांच्या विशेष पुढाकारातून आणि नियोजनातून हे अभियान शहापूर
तालुक्यातील कानाकोपऱ्यात, गावे आणि वाड्या-वस्त्यांमध्ये अत्यंत यशस्वीरीत्या राबवले
जात आहे. याचाच भाग म्हणून मंडळ गोठेघर, मौजे गोठेघर येथील वन पट्टे धारकास स्वतंत्र
सातबारा तयार करून संबंधित लाभार्थ्यास सातबारा प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन सुपूर्द
करण्यात आले.
जनकल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत वेळेत
पोहोचवून 'सेवा संकल्प' अभियानाच्या माध्यमातून ठाणे जिल्हा प्रशासनाने लोकसेवेचा एक
उत्तम वस्तुपाठ घालून दिला आहे.
000000000


Comments
Post a Comment