गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त ठाण्यात 'लोककलेतील श्री गणेश' कार्यक्रमाचे शानदार आयोजन;'bappa.org' मोहिमेचाही नागरिकांना लाभ

 




 

ठाणे,दि.18(जिमाका): गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने आणि जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने राम गणेश गडकरी रंगायतन येथे 'लोककलेतील श्री गणेश' या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे अत्यंत दिमाखदार वातावरणात काल दि.१६ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि पारंपरिक गणेशोत्सवाचा वारसा अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

या विशेष सांस्कृतिक सोहळ्यात २० कलाकारांच्या संचाने पारंपरिक लोककलांचे अप्रतिम सादरीकरण केले. यामध्ये नमन, गण, गोंधळी नृत्य, मंगळागौर, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य आणि जागर-गोंधळ यांसारख्या महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक लोककलांचा समावेश होता.या विविधरंगी सादरीकरणामुळे संपूर्ण प्रेक्षागृह भक्तिमय व उत्साही वातावरणाने दुमदुमून गेले.

सुप्रसिद्ध अभिनेते सुशांत शेलार यांच्या 'शेलारमामा फाउंडेशन'च्या समन्वयातून विनामूल्य आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये जिल्हा नियोजन अधिकारी आणि 'bappa.org' मोहिमेचे नोडल अधिकारी वैभव कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करत हा सोहळा अत्यंत नेटका आणि भव्यदिव्य स्वरूपात पार पाडला.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या 'bappa.org' या विशेष मोहिमेबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. पर्यावरणपूरक आणि सुटसुटीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, तसंच गणेशोत्सव मंडळांची नोंदणी, विविध शासकीय परवानग्या आणि गणेशोत्सवाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी 'bappa.org' ही डिजिटल प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांना शासकीय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करणे शक्य झाले आहे.

महाराष्ट्राची संस्कृती, आपली ओळख आणि आपला गणेशोत्सव हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवत लोककला आणि प्रशासकीय उपक्रमांचा हा अनोखा संगम ठाणेकरांसाठी एक अभूतपूर्व अनुभव ठरला.

000000000

 

 

 

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन