‘सेवा संकल्प’ अभियानातून ठाणे जिल्हा परिषदेचा लोकाभिमुख कारभाराचा वस्तुपाठ मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद..!

 




 

ठाणे,दि.1(जिमाका) : ग्रामीण भागातील अंतिम घटकापर्यंत शासकीय योजनांचे लाभ वेगाने पोहोचवणे आणि लोककल्याणाचा ध्यास घेऊन ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात आलेले ‘सेवा संकल्प अभियान’ अत्यंत यशस्वी ठरले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या सक्षम, संवेदनशील आणि ध्येयवादी नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेने एकूण 804 उपक्रम यशस्वीरीत्या राबवून प्रशासकीय कार्यक्षमतेचा एक नवा वस्तूपाठ सर्वसामान्यांसमोर ठेवाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, सर्व विभागप्रमुख आणि त्यांच्या संपूर्ण टिमच्या अहोरात्र मेहनतीमुळे हे अभियान केवळ शासकीय सोपस्कार न राहता लोककल्याणाची एक व्यापक चळवळ बनले आहे.

            या अभियानांतर्गत विविध विभागांनी उत्तम कामगिरी बजावली असून, सर्वाधिक 217 उपक्रम हे आरोग्य विभागाने राबवले आहेत. यामध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, पोषण व ॲनिमिया जागरूकता, महिला आरोग्य व स्वच्छता, मानसिक आरोग्य समुपदेशन, व्यसनमुक्ती जनजागृती, रक्तदान शिबिरे, अंधत्व निवारणासाठी चष्मे वाटप आणि दुर्धर आजारग्रस्त बालकांवर उपचार यांसारखे संवेदनशील उपक्रम पार पडले.   

            त्यापाठोपाठ महिला व बाल विकास विभागाने 214 उपक्रम राबवून पोषण माह, बेबीकीट वाटप, अंगणवाडी परिसराची स्वच्छता, वृक्षारोपण, माता-पालक मेळावे तसेच अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे प्रशिक्षण आयोजित केले.

            शिक्षण विभागाने 136 उपक्रमांच्या माध्यमातून करिअर समुपदेशन, फिट इंडिया क्रीडा स्पर्धा, आश्रमशाळांमध्ये योग साधना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्रे, स्वच्छता रॅली आणि वाचन पेटी वाटप यांसारख्या विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला.

            त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागाने 81 उपक्रम राबवून शालेय गणवेश वाटप, वॉटर कुलर वाटप, योग साधना, क्रीडा स्पर्धा आणि दिव्यांग महाशिबिरांचे आयोजन केले.   

            तर ग्रामपंचायत विभागाने 66 उपक्रमांतून स्वच्छता मोहिमा, विशेष ग्रामसभा, मुख्यमंत्री बळीराजा समृद्धी योजना व कार्यालयीन परिसराचे सुशोभीकरण केले.

            कृषी विभागाने 27 उपक्रमांतून शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, योजनांचे मार्गदर्शन आणि बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांचे लाभ मिळवून दिले.

            पशुसंवर्धन विभागाने 23 उपक्रम, ग्रामीण विकास यंत्रणेने 20 उपक्रम, पाणी पुरवठा विभागाने 16 उपक्रम आणि लघु पाटबंधारे विभागाने 4 उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करत सर्वच क्षेत्रात विकासाचा संदेश पोहोचवला.

            तालुकानिहाय अंमलबजावणीचा विचार करता, भिवंडी तालुक्यात सर्वाधिक 378 उपक्रम पार पडले असून अंबरनाथमध्ये 158, शहापूरमध्ये 102, कल्याणमध्ये 86 आणि मुरबाड तालुक्यात 80 उपक्रम राबवून संपूर्ण जिल्ह्यात अभियानाचा प्रभावी विस्तार करण्यात आला.

            मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या सूक्ष्म नियोजन आणि त्यांच्या सहकारी अधिकार्‍यांनी दाखविलेल्या प्रशासकीय गतिशीलतेमुळे जिल्हा परिषदेचा प्रत्येक विभाग या अभियानात पूर्ण ताकदीने उतरला होता. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा थेट दारापर्यंत मिळवून देण्याच्या या ध्यासामुळे ठाणे जिल्हा परिषदेची प्रतिमा अधिक लोकाभिमुख, उत्तरदायी आणि संवेदनशील प्रशासन म्हणून सर्वदूर उंचावली आहे.

0000000000

 

 

 


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन