शासकीय सेवा नागरिकांच्या दारी;विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध शेलार येथे आयोजित ‘सेवा संकल्प’ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे,दि.2(जिमाका)
: पंतप्रधान श्री. नरेंद्र
मोदी यांच्या संविधानिक पदावरील यशस्वी कारकीर्दीस 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने
तसेच “सेवा परमो धर्मः” या उदात्त भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत
विविध शासकीय सेवा, सुविधा व कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यासाठी
राज्य शासनामार्फत दि. 17 सप्टेंबर 2026 ते दि.17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत “सेवा संकल्प अभियान” संपूर्ण राज्यभरात अत्यंत उत्साहात राबविण्यात
येत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून, दि. 01 ऑक्टोबर 2026 रोजी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.
संदीप माने, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप तसेच तहसिलदार अभिजीत खोले यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि उपविभागीय अधिकारी व तहसिलदार कार्यालय, भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ
शेलार अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, शेलार येथील सभागृहात मंडळस्तरीय विशेष 'सेवा
संकल्प' शिबिराचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी
जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या शिबिरास महसूल नायब तहसिलदार आदेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य
श्री. दीपक जनार्दन भोईर, श्री. विलास गोविंद रापटे, सामाजिक कार्यकर्ते श्री. भरत
नामदेव भोईर आणि ग्रामपंचायत सदस्य श्री. दशरथ बाळू भोईर आदी मान्यवर आवर्जून उपस्थित
होते. तसेच शेलारचे मंडळ अधिकारी श्री. धनंजय आर. वतारी, सहाय्यक मंडळ अधिकारी श्री.
किरण केदार, महसूल सहाय्यक श्री. आनंद तिवाड, ग्राम महसूल अधिकारी श्री. रुपेश कारभारी,
श्रीमती शारदा घोलप, श्रीमती दीप्ती जाधव, महसूल सेवक, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी,
उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भिवंडी येथील कर्मचारी, ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी
आणि संबंधित विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत प्रभावी समन्वय साधत नागरिकांच्या
अडचणी थेट समजून घेतल्या. या शिबिरादरम्यान महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाशी संबंधित
विविध सेवा, दाखले आणि शासकीय कागदपत्रांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले.
दिवसभरात पार पडलेल्या या शिबिरात महसूल विभागांतर्गत ७६ सातबारा उतारे, २५ फेरफार उतारे, १४
आठ-अ उतारे, २७ नमुना ७/इ व १२/इ (वनपट्टे) उतारे, ०४ नकाशा नक्कली, ०३ माहितीचा अधिकार
अर्ज तसेच ०२ गावठाण सनदींचे वाटप करण्यात आले. याशिवाय १२ वनपट्टे KYC, महिला शेतकरी
योजनेचे १६ लाभ, १२ पाणंद रस्ते विषयक कामे, ०१ कलम ४३ सुधारणा प्रकरण आणि ०२ ॲग्रीस्टॅक
फार्मर आयडी जनरेट करण्यात आले.
ग्रामपंचायत विभागामार्फत ०५ मृत्यू दाखले, ०२ विवाह नोंदणी प्रमाणपत्रे
आणि १४ रहिवासी दाखल्यांचे त्वरित
वाटप करण्यात आले.
कृषी विभागाकडून महाकृषी ॲपबाबत १२ तर महाविस्तार ॲपबाबत ०३ शेतकऱ्यांना मार्गदर्शन व नोंदणी सुविधा
पुरविण्यात आली.
या शिबिरामध्ये महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या विविध कल्याणकारी
योजनांची माहिती नागरिकांना थेट व सोप्या भाषेत देण्यात आली. नागरिकांच्या विविध अडचणी
व प्रलंबित प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांनी जागेवरच योग्य ती कार्यवाही आणि मार्गदर्शन
केले.
मंडळ शेलार परिसरातील नागरिक, शेतकरी बांधव व सर्वसामान्य लाभार्थ्यांना
महसूलविषयक कागदपत्रे, दाखले व शासकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने वेळ व श्रमाची
मोठी बचत झाली. पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या
संख्येने हजेरी लावली.
"शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारी" पोहोचवून कारभारात
सुलभता, गती आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने आयोजित केलेले हे सेवा संकल्प शिबिर
सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत उपयुक्त आणि समाधानकारक ठरले आहे. जनतेने व्यक्त केलेल्या
कृतज्ञतेच्या भावना ऐकून उपस्थित अधिकाऱ्यांनाही लोकोपयोगी काम केल्याचे मनापासून समाधान
लाभले.
0000000000
.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment