राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षांची ठाण्यात संवेदनशील व तत्पर कामगिरी बेघर कुटुंबांना ऑन-द-स्पॉट शासकीय योजनांचा लाभ

 



 

ठाणे,दि.9(जिमाका) :- राज्य अन्न आयोगाच्या ठाणे जिल्हा दौऱ्यादरम्यान आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी अत्यंत कौतुकास्पद आणि संवेदनशील निर्णय घेत प्रशासकीय गतिमानतेचे एक उत्तम उदाहरण सादर केले आहे. दौऱ्यादरम्यान ठाणे शहरातील ब्रिजखाली अत्यंत भीषण आणि हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या बेघर कुटुंबांकडे अध्यक्षांचे लक्ष जाताच त्यांनी तातडीने आपला ताफा थांबवला. त्यांनी प्रत्यक्ष त्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि जागच्या जागीच संबंधित प्रशासनाला त्यांना तातडीने शासकीय योजनांशी जोडण्याचे थेट निर्देश दिले.

अध्यक्षांच्या या निर्देशानंतर स्थानिक प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि ऑन-द-स्पॉट कारवाई यामुळे पीडित कुटुंबांना तात्काळ मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे अन्न, निवारा आणि मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत, या ध्येयासाठी राज्य अन्न आयोग कटिबद्ध असल्याचे या प्रत्यक्ष कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

या बेघर कुटुंबांना दीर्घकालीन आणि शाश्वत मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना अन्न सुरक्षेचा हक्क मिळवून देण्यासाठी रेशन कार्ड आणि मोफत अथवा सवलतीच्या दरातील धान्य योजनेचा तातडीने लाभ दिला जात आहे.   

त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागाद्वारे या कुटुंबातील महिला, बालके आणि गरोदर मातांसाठी पोषण आहार, अंगणवाडी सुविधा आणि इतर विशेष कल्याणकारी योजना लागू करण्यात येत आहेत. याशिवाय त्यांच्या आरोग्य तपासणीसह आधार कार्ड आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी महाराष्ट्र राज्य भीकमुक्त, भूकमुक्त आणि कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. आपल्या निदर्शनास असे कोणतेही बेघर किंवा गरजू लाभार्थी आल्यास नागरिकांनी पुढाकार घेऊन एक मदतीचा हात म्हणून त्यांना शासनाच्या योजनांशी जोडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच या कार्यात काही अडथळा किंवा अडचण येत असल्यास थेट राज्य अन्न आयोगाशी संपर्क साधण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत.

00000000000000

 


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन