"आधुनिक शिक्षणाचे शिल्पकार: महात्मा जोतिराव फुले:"

 



        महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासात महात्मा जोतिराव फुले यांचे नाव सुवर्णक्षरांनी लिहिले गेले आहे. ज्या काळात शिक्षण ही केवळ ठराविक उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी होती, त्या काळात त्यांनी व त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्वसामान्य, बहुजन, शोषित आणि विशेषतः महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.

            महात्मा फुले यांनी शिक्षणाला केवळ ज्ञानाचे साधन मानले नाही, तर तो मानवी हक्क आणि परिवर्तनाचे सर्वात प्रभावी हत्यार मानले.

            या लेखातून आपण महात्मा फुले यांचे शिक्षणाविषयीचे विचार, त्यांनी केलेली सुधारणांची कामे आणि आजच्या समाजावर झालेला त्याचा सकारात्मक परिणाम समजून घेणार आहोत.

            महात्मा फुले यांच्या विचारांचे केंद्रबिंदू माणूस आणि त्याची प्रगती होते. शिक्षणाशिवाय माणसाला स्वतःचे भले-बुरे कळत नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. अज्ञानामुळेच माणसात दुजाभाव निर्माण होतो, म्हणून त्यांनी विद्येविना मूक गेले, मूकविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अद्यन्‍याने केले, या शब्दात शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे.

            स्त्री ही कुटुंबाची आणि समाजाचा पाया आहे, जर स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकेल आणि सुसंस्कृत होईल, असा त्यांचा ठाम विश्वास होता. जात, धर्म, लिंग असा कोणताही भेद न मानता समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाचा समान अधिकार मिळाला पाहिजे, ही त्यांची मुख्य भूमिका होती.

            फक्त विचार मांडून न थांबता महात्मा फुले यांनी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण क्षेत्राचा पाया रचला. त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात १ जानेवारी १८४८ रोजी देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. सुरुवातीला सावित्रीबाईंना समाजकंटकांच्या विरोधाचा सामना करावा लागला, अंगावर शेण-मातीफेक सहन करावी लागली, परंतु ते मागे हटले नाहीत. बहुजन समाजातील मुला-मुलींसाठी, मागासवर्गीयांसाठी तसेच अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गातील मुलांसाठी त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. पुणे नगरपालिकेचे नगरसेवक असताना त्यांनी शिक्षण प्रसारासाठी विशेष भर दिला आणि गोरगरिबांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत मिळावे यासाठी प्रयत्न केले.

            २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, पुरोहितांच्या वर्चस्वाला विरोध आणि लोकशिक्षणावर भर दिला.

महात्मा फुले यांनी रोवलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या कार्याचा आजच्या समाजावर अत्यंत सकारात्मक परिणाम झाला आहे. आज महिला डॉक्टर, वैज्ञानिक, इंजिनिअर, पायलट, राजकारणी आणि अधिकारी म्हणून देशाच्या सर्वोच्च पदांवर झळकत आहेत. या सर्वांचा पाया महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी रचलेल्या शाळेतच रोवला गेला होता.

            शिक्षणाप्रमाणेच शोषित आणि वंचित घटकांना समाजात हक्क, मान-सन्मान आणि समान संधी मिळाली. संविधानाने दिलेले हक्क समजून घेण्याची ताकद त्यांना शिक्षणातूनच लाभली आहे. आज भारताचे तरुण-तरुणी जागतिक पातळीवर सॉफ्टवेअर, संशोधन, उद्योग आणि व्यवस्थापन क्षेत्रात भारताचा झेंडा रोवत आहेत, आणि या सर्व बौद्धिक प्रगतीचे मूळ महात्मा फुले यांनी लावलेल्या शैक्षणिक सुधारणांच्या पायात आहे.

            महात्मा जोतिराव फुले हे केवळ एक समाजसुधारक नव्हते, तर ते आधुनिक भारताचे खरे मार्गदर्शक होते. त्यांनी लावलेली शिक्षणाची ज्योत आज घराघरांपर्यंत पोहोचली आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे आणि प्रत्येकाला शिक्षणाचा प्रकाश मिळवून देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी

ठाणे/रायगड

0000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन