"सेवा संकल्प" अभियानांतर्गत ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचा लोकाभिमुख मुरबाड दौरा वैशाखरे येथे आदिवासी भोंडाई महोत्सवाला उपस्थिती; प्रत्यक्ष बांधावर जावून भातपिकांची पाहणी अन् आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला आपुलकीचा संवाद...!

 



ठाणे,दि.18(जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या "सेवा संकल्प" अभियानांतर्गत प्रशासनाला थेट जनतेच्या दारापर्यंत नेण्याचा ध्यास घेत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल दि.17 ऑक्टोबर रोजी मुरबाड तालुक्यात लोकाभिमुख दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेती, शिक्षण, आरोग्य आणि महसूल अशा सर्वच महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजाची प्रगती प्रत्यक्ष जाणून घेतली.

वैशाखरे येथे पारंपरिक "आदिवासी भोंडाई " महोत्सवाचा उत्साह..

दौऱ्याचा शुभारंभ वैशाखरे येथे आयोजित पारंपरिक आदिवासी भोंडाई महोत्सवाने झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे आणि लोकपरंपरेचे दर्शन घडले. याप्रसंगी जिल्हाधिकारी महोदयांचा बैलगाडीवरून प्रवास तसेच आदिवासी बांधवांच्या पारंपारिक नृत्यात स्वतः जिल्हाधिकारी महोदयांचा सहभाग यातून खरोखरीच लोकाभिमुख प्रशासनाचा चेहरा दिसून आला.

याप्रसंगी स्थानिक आमदार किसन कथोरे, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे तसेच मुरबाडचे तहसिलदार अभिजीत देशमुख यांचीही विशेष उपस्थिती होती.

दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या बांधावर थेट पाहणी...

महोत्सव आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ शेतकऱ्यांच्या भेटीसाठी थेट शेतात पोहोचले. तालुक्यातील भातपिकांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांचे झालेले नुकसान आणि वस्तुस्थिती समजून घेण्यासोबतच 'DCH पीक पाहणी' प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावाही घेतला. त्याचबरोबर त्यांनी पारंपारिकरित्या मासे पकडण्याचे कसबही अनुभवले. आदिवासी बांधव आपल्या कलाकुसरीतून बांबूपासून विविध वस्तू कौशल्याने बनवितात, त्याचाही अनुभव याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी घेतला. जिल्हा प्रशासनाने थेट बांधावर येऊन शेतकऱ्यांविषयी अशा प्रकारे दखल घेतल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

मढ आश्रमशाळेत विद्यार्थ्यांशी साधला आपुलकीने मनमोकळा संवाद..

क्षेत्रभेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मढ येथील शासकीय आश्रमशाळेला भेट दिली. तेथे त्यांनी वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांच्या शैक्षणिक तसेच दैनंदिन अनुभवांबद्दल आपुलकीने विचारपूस केली. दुर्गम व आदिवासी भागातील पाड्यांवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा संवाद अत्यंत फलदायी ठरला.

धसई प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा..

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी डॉ. पांचाळ यांनी धसई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा, औषधसाठा आणि आरोग्य केंद्रातील स्वच्छतेची त्यांनी बारकाईने पाहणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

धसई तलाठी कार्यालयाची पाहणी..

सामान्य नागरिकांचा रोजचा संबंध येणाऱ्या धसई तलाठी कार्यालयाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. सातबारा उतारे, फेरफार नोंदी आणि इतर महसुली सेवा नागरिकांना विनाअडथळा व वेळेत मिळतात की नाही, याचा प्रत्यक्ष कारभार त्यांनी तपासला. ग्रामीण जनतेचे प्रश्न वेळेत सुटावेत आणि महसूल प्रशासन अधिक पारदर्शक व्हावे, यावर त्यांनी भर दिला.

आदिवासी संस्कृतीचा गौरव करण्यापासून ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यापर्यंत, तसेच विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यापासून ते आरोग्य व महसूल यंत्रणेला गती देण्यापर्यंत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा हा दौरा अत्यंत व्यापक ठरला. 'सेवा संकल्प अभियाना'च्या माध्यमातून शासन आणि प्रशासन कागदावर न राहता प्रत्यक्ष जनतेच्या दारात उभे आहे, हाच संदेश या दौऱ्याच्या माध्यमातून मुरबाडवासीयांपर्यंत पोहोचला आहे.

000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन