ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करून देण्यास मनाई

 


 

ठाणे,दि.19(जिमाका) : ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची डिजिटल ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने फार्मर आयडी (Farmer ID) तयार करण्यात येत आहेत. तथापि, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ॲग्रीस्टॅक अंतर्गत प्राप्त फार्मर आयडीच्या आधारे कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मार्फत शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ओळखपत्रे तयार करून वितरित केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच, अशा प्रकारच्या ओळखपत्रांच्या संदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

या अनुषंगाने, केंद्र शासनाच्या दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्राद्वारे ॲग्रीस्टॅक अंतर्गत प्राप्त फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करणे व त्याचे वितरण करणे अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे, राज्यातील सर्व कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चालकांनी ॲग्रीस्टॅक अंतर्गत प्राप्त फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्रे तयार करणे व त्यांचे वितरण करणे तात्काळ थांबवावे. तसेच, यापुढे अशा प्रकारची कोणतीही अनधिकृत कार्यवाही करण्यात येऊ नये, याची संबंधित केंद्रचालकांनी दक्षता घ्यावी.

शेतकऱ्यांनीही याबाबत जागरूक राहून फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करून देण्याच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या अनधिकृत सेवांचा लाभ घेऊ नये. अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या ओळखपत्रांना अधिकृत मान्यता असल्याचे समजू नये.

            ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडीच्या वापराबाबत केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य, पुणे कृषी आयुक्तालय संचालक ॲग्रीस्टॅक बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

00000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन