ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य

 

 


 

ठाणे,दि.16(जिमाका) :-  इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) (धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना' राबविण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भोजन, निवास व निर्वाहासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून निर्धारित केलेल्या निकषांनुसार वार्षिक आर्थिक मदत दिली जाते.

ठिकाणानुसार मिळणारे वार्षिक आर्थिक सहाय्य

या योजनेअंतर्गत मुंबई, ठाणे व पुणे शहरांतील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक रु.60 हजार पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. इतर महसुली विभागीय शहरांसाठी ही मर्यादा रु.51 हजार पर्यंत, इतर जिल्ह्यांसाठी रु. 43 हजार पर्यंत, तर तालुकास्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रु. 38 हजार पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

शैक्षणिक व इतर पात्रता निकष

योजनेचा लाभ घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस बारावीच्या परीक्षेत किमान 50 टक्के गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. डिप्लोमा पूर्ण करून पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा परीक्षेत तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदवी परीक्षेत किमान 50 टक्के गुण प्राप्त असणे बंधनकारक आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाचे व निवासस्थानाचे अंतर यासंबंधी लागू नियमांनुसार महाविद्यालयाकडून 5 किलोमीटर अंतराचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच विद्यार्थ्यांनी संबंधित OBC, VJNT किंवा SBC प्रवर्गातील असणे, आवश्यक जात प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे सादर करणे, मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असणे आणि शासनाने निर्धारित केलेल्या उत्पन्न, उपस्थिती व इतर पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2026

ठाणे जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्यापूर्वी शासनाच्या अधिकृत नियमावलीनुसार पात्रता व आवश्यक कागदपत्रांची खात्री करून घेणे गरजेचे आहे. या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2026 ही आहे.

अधिक माहितीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे (दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, कळवा, जि. ठाणे) येथे संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक समाधान इंगळे यांनी केले आहे.

0000000000000

 


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन