डिजिटल अरेस्ट आणि पेन्शन फसवणुकीविरुद्ध वासिंद पोलिसांचे कवच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जनजागृती उपक्रम

 


 





ठाणे, दि.6(जिमाका):- वासिंद पोलीस ठाण्याच्या वतीने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन क्लृप्त्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एका विशेष संवादात्मक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या डिजिटल अरेस्ट, पेन्शन फसवणूक आणि विविध प्रकारच्या ऑनलाइन आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

            कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना सायबर भामट्यांची गुन्हे करण्याची कार्यपद्धती आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा, याचे अत्यंत सोप्या भाषेत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

            आजकाल सायबर गुन्हेगार बँक अधिकारी असल्याचे भासवून ओटीपी किंवा केवायसी अपडेटच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करतात. इतकेच नव्हे तर व्हॉट्सॲपवर मुलगा किंवा जवळचा नातेवाईक अडचणीत असल्याचे सांगून ऐनवेळी पैशांची मागणी करणे, 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून मानसिक दबाव आणणे, लॉटरी किंवा केबीसीमध्ये मोठे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवणे, अनोळखी एपीके फाईल डाऊनलोड करायला लावून बँक खात्यावर दरोडा टाकणे तसेच कॅप्चा भरून घरबसल्या पैसे कमवण्याचे प्रलोभन दाखवणे, अशा अनेक प्रकारच्या फसवणुकीच्या मार्गांची सविस्तर माहिती या वेळी नागरिकांना देण्यात आली.

            या सर्व सायबर धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांना सतर्कतेचा महत्त्वाचा मंत्र दिला. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला ओटीपी, पासवर्ड किंवा बँकेशी संबंधित अत्यंत गोपनीय माहिती कधीही देऊ नये. अनोळखी लिंक अथवा संशयास्पद एपीके फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नये. असा कोणताही संशयास्पद फोन आल्यास न घाबरता आणि संभाषण पुढे न वाढवता तत्काळ फोन बंद करावा व पोलिसांशी संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला.

            दुर्दैवाने फसवणूक झाल्यास सुरुवातीचा 'गोल्डन अवर' अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रसंगी न घाबरता तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा mhcyber.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तक्रार नोंदवावी.

            हा महत्त्वपूर्ण जनजागृती उपक्रम ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहापूर) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच वासिंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

            भविष्यात कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळीच १९३० या क्रमांकावर कॉल करावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन वासिंद पोलिसांकडून करण्यात आले आहे.

000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन