वाशीत रंगणार औद्योगिक तंत्रज्ञानाचा महाकुंभ; 'बॉइलर इंडिया २०२६' आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे ८ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन!
ठाणे, दि.७(जिमाका): उद्योग जगतातील
अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित मानला जाणारा ‘बॉइलर इंडिया २०२६’ (Boiler
India 2026) हा तीन दिवसीय भव्य आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, चर्चासत्र व प्रदर्शन सोहळा
८ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित
करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभाग आणि बाष्पके
संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने बाष्पकांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर, हिट एक्सचेंजर्स,
प्रेशर वेसल्स निर्मितीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी
या विषयांवर आधारित हा भव्य उपक्रम साकारला जात आहे.
या
आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी
१०:३० वाजता सिडको प्रदर्शन केंद्रात संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष व उद्घाटक
म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. तर
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम - सार्वजनिक
उपक्रम मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक
विकास व औकाफ मंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार हे मुख्य अतिथी म्हणून या सोहळ्यासाठी
उपस्थित राहणार आहेत.
या
संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर हे असतील. उद्घाटन
सोहळ्याला राज्य शासनातील विविध विभागांचे मंत्री प्रमुख उपस्थित म्हणून लाभणार आहेत.
यामध्ये वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कामगार, वित्त, नियोजन,
कृषी, मदत व पुनर्वसन आणि विधी व न्याय राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, परशुराम आर्थिक
विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा)आशिष दामले आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या
महापौर श्रीमती सुजाता पाटील यांचा समावेश आहे.
या राज्यस्तरीय सोहळ्यासाठी लोकप्रतिनिधींची विशेष
उपस्थिती असणार आहे. यामध्ये खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, नरेश गणपत म्हस्के व
बाळ्या मामा-सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे लोकसभा सदस्य उपस्थित राहतील. तर विधानपरिषदेचे
आमदार निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, ज्ञानेश्वर म्हात्रे व श्रीमती माधवी नाईक यांच्यासह
विधानसभेचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, दौलत दरोडा, डॉ.बालाजी किणीकर, महेश चौघुले,
रईस शेख, रविंद्र चव्हाण, श्रीमती मंदा म्हात्रे, कुमार आयलानी, नरेंद्र मेहता, राजेश
मोरे, किसन कथोरे, संजय केळकर, शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर आणि श्रीमती सुलभा गायकवाड
हे सर्व सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रशासकीय
स्तरावरही या कार्यक्रमासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून यामध्ये
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे प्रमुख उपस्थित म्हणून तर कामगार विभागाच्या
अपर मुख्य सचिव श्रीमती आय. ए. कुंदन या स्वागतोत्सुक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
याशिवाय कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, ठाण्याचे जिल्हाधिकारी
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, राज्याचे कामगार आयुक्त डॉ.एच. पी. तुम्मोड, असंघटित कामगार
विभागाचे विकास आयुक्त श्री. सुशील खोडवेकर , नवी दिल्ली येथील डीपीआयआयटी केंद्रीय
बाष्पके मंडळाचे सचिव व तांत्रिक सल्लागार श्री.संदीप कुंभार आणि महाराष्ट्र राज्याचे
बाष्पके संचालनालयाचे प्रभारी संचालक श्री. संदीप चिवटे हे विशेष अधिकारी म्हणून या
कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
८ ते १० ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत तांत्रिक
आणि औद्योगिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चासत्रे आयोजित करण्यात
आली आहेत. पहिल्या दिवशी, म्हणजे ८ ऑक्टोबरला ॲडव्हान्स्ड अल्ट्रा सुपर-क्रिटिकल पॉवर
प्लांट्स, बायोमास व वेस्ट फ्यूल्सद्वारे डिकार्बोनायझेशन आणि उच्च-कार्यक्षम CFBC
बॉइलर तंत्रज्ञान यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
दुसऱ्या दिवशी, ९ ऑक्टोबर रोजी एआय-आधारित प्रेडिक्टिव्ह
मेंटेनन्स, ॲग्रो-वेस्ट ऊर्जा निर्मिती, बायोमास ऊर्जा, वॉटर केमिस्ट्री व्यवस्थापन
आणि वेस्ट-टू-एनर्जी तंत्रज्ञानावर भर दिला जाईल.
अंतिम दिवशी, १० ऑक्टोबर रोजी नवीन बॉइलर ॲक्ट २०२५
व नवीन नियम, अपघात विश्लेषण व सुरक्षा, ऊर्जा बचत आणि उत्कृष्ट बॉइलर वापरकर्त्यांसाठी
'बेस्ट बॉइलर युझर अवॉर्ड' वितरण सोहळा पार पडेल.
बाष्पके क्षेत्रातील हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन
उद्योग विश्वाला नवी दिशा देणारे ठरणार असून, उद्योगपती, अभियंते, तंत्रज्ञ आणि नागरिकांनी
या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन बाष्पके संचालनालयाचे प्रभारी
संचालक श्री. संदीप चिवटे यांनी केले आहे.
000000000
Comments
Post a Comment