नागपूर परिमंडलाच्या ‘थलाई कुथल’ नाटकाचा महावितरणच्या ‘नाट्यबहार’ स्पर्धेत प्रथम क्रमांक
ठाणे,दि.23(जिमाका) : पुणे येथील लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आयोजित महावितरणच्या ‘नाट्यबहार’ या आंतरप्रादेशिक
राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाच्या ‘थलाई कुथल’ या नाटकाने प्रथम
क्रमांक पटकावला आहे, तर कोल्हापूर परिमंडलाच्या ‘समोरच्या घरात’ या नाटकाला
द्वितीय क्रमांक मिळाला आहे. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध सामाजिक
विषयांवरील चार नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभास
महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कोकण प्रादेशिक विभागाचे
सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, कार्यकारी संचालक परेश भागवत, अंकुर कावळे,
सुनील काकडे आणि नागपूर प्रादेशिक संचालक राजेश नाईक, समन्वयक संजय ढोके, प्रभारी
मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर तसेच परीक्षक राज काझी, अजय धनवे, शुभांगी पाठक व
राज कुबेर यांची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना संचालक
राजेंद्र पवार यांनी आव्हानात्मक परिस्थितीत दैनंदिन जबाबदारी सांभाळत कला जिवंत
ठेवणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप
जगदाळे यांनी अध्यक्षीय मनोगतात सर्व कलाकारांच्या सादरीकरणाची प्रशंसा केली.
प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे परिमंडलाने या
स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. प्रादेशिक संचालक सुनील काकडे यांनी प्रास्ताविक
केले. सौ. मृदुला शिवदे व सौ. भक्ती जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर उपमुख्य
औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे यांनी आभार मानले.
स्पर्धेत पहिल्या दिवशी
‘ओल्या भिंती’ व ‘समोरच्या घरात’, तर दुसऱ्या दिवशी ‘वारी’ व ‘थलाई कुथल’ ही नाटके
सादर झाली.
स्पर्धेच्या वैयक्तिक व
तांत्रिक विभागात ‘थलाई कुथल’ नाटकासाठी प्रफुल्ल लांडे यांनी उत्कृष्ट दिग्दर्शन,
सुजाता सोनटक्के यांनी प्रकाशयोजना, धर्मदीप फुलझेले यांनी पार्श्वसंगीत आणि समिधा
लोहरे यांनी रंगभूषा व वेशभूषा या विभागांत प्रथम क्रमांक मिळवला. ‘समोरच्या घरात’
नाटकासाठी विठ्ठल पाटील यांनी नेपथ्य, जयतीर्थ सांगलीकर यांनी उत्कृष्ट अभिनेता
आणि श्वेता सांगलीकर यांनी उत्कृष्ट अभिनेत्री या विभागांत प्रथम क्रमांक पटकावला.
याशिवाय प्रिती फुले
(नेपथ्य), आशिष मेहता (प्रकाशयोजना), दत्तात्रय भणगे (रंगभूषा व वेशभूषा), अमित
बोकील (दिग्दर्शन) आणि असित रामटेके (उत्कृष्ट अभिनेता) यांना द्वितीय क्रमांक
मिळाला. ‘वारी’ नाटकासाठी आशिष कासार यांना पार्श्वसंगीताचा द्वितीय क्रमांक, तर
‘ओल्या भिंती’ नाटकासाठी प्रणाली निमजे यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा द्वितीय
क्रमांक मिळाला. पौर्णिमा पुरोहित, दिपाली नरवडे, संगीता चव्हाण आणि प्रशांत मडावी
यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.
00000000000

Comments
Post a Comment