ठाण्यातून ‘महा आर-पेट बॉटल व स्टिकर्स’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ प्लास्टिक पुनर्रचनेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे
ठाणे,दि.2(जिमाका): पर्यावरणाचा समतोल राखणे आणि प्लास्टिकचा
वाढता प्रभाव रोखणे, ही काळाची गरज बनली असून ‘ग्लोबल वॉर्मिंग’ थांबवण्यासाठी सर्वांच्या एकत्र येण्याची
आवश्यकता आहे. प्लास्टिक अमर असले तरी त्याचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर आहेत. या पार्श्वभूमीवर,
शासनाचा एकही रुपया खर्च न करता स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) मदतीने प्लास्टिक पुनर्रक्रियेचे
महत्त्वपूर्ण कार्य सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील १३ ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या
‘महा आर-पेट’ या अभियानाची सुरुवात ठाण्यातून
होत असून, असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असे प्रतिपादन
राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले.
ठाण्यातील हॉटेल विवांतच्या सभागृहात हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस
कंपनी, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महा आर-पेट बॉटल व स्टिकर्स अनावरण आणि उद्घाटन’ प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव श्री.राहुल
रेखावार, कोका कोलाचे क्लस्टर हेड के.के. जोसेफ, चीफ पब्लिक अफेअर्स हिमांशू प्रियदर्शी
तसेच प्रसिद्ध सिनेकलाकार प्रसाद ओक, डिनो जोसेफ, शिवानी सुर्वे, अमित रेयॉन यांच्यासह
विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरणमंत्री मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले
की, “पर्यावरण विभागातर्फे फोटो, व्हिडिओ आणि
सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. परंतु कर्तव्य आणि हक्क या एकाच
नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्त आरसा पुसून चालणार नाही, तर डाग पुसला पाहिजे. ‘एक
बॉटल पर्यावरण के नाम’ असे म्हणत प्रत्येकाने
या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे.”
कार्यक्रमास उपस्थित विधानसभा सदस्य आमदार माधवी नाईक यांनी या उपक्रमाचे
स्वागत करत सांगितले की, हा राज्यातील पहिलाच प्रोजेक्ट ठाण्यातून सुरू होत आहे. लोकप्रतिनिधी
आणि सामान्य नागरिक म्हणून या अभियानाला पूर्ण सहकार्य केले जाईल. प्लास्टिकचा वापर
कमी करून पर्यावरणाला योग्य दिशा देण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे.
आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले की, पर्यावरण विभाग व राज्य शासनामार्फत
सुरू होणारे हे महा आर-पेट अभियान राज्यभर पसरणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी विविध
कंपन्यांनी आपल्या शाखांचा विस्तार करत पुढाकार घेतला पाहिजे.
अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी ठाणे जिल्ह्याची निवड केल्याबद्दल
समाधान व्यक्त केले. या अभियानाची मोठी जबाबदारी जिल्ह्यावर असून, जास्तीत जास्त सहभाग
नोंदवण्यासाठी आणि उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,
असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार
यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी सांगताना स्पष्ट केले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण
महामंडळाकडून पर्यावरणाचा ताण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. फेब्रुवारी
२०२६ मध्ये मुंबईत या उपक्रमाचे पहिले पाऊल पडले होते. सखोल नियोजनाद्वारे ही प्रक्रिया
तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून प्लास्टिकचा वापर कमी केला जाईल. ‘लाईफ’ (LiFE) या संकल्पनेचे पालन करून २०४७
पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटीचे (Carbon Neutral) ध्येय साध्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
00000000
.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment