मधुमक्षिका पालनातून उत्पन्न व रोजगार निर्मितीला चालना; राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियानांतर्गत (NBHM) महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

 



 

ठाणे,दि.9(जिमाका) :- मधुमक्षिका पालनाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि ‘मधुरक्रांती’ (स्वीट रिव्होल्युशन) ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान (NBHM) अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. राज्यातील फलोत्पादन क्षेत्रात उत्पादन वाढ व्हावी आणि ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

कृषी आयुक्तालय, पुण्याचे फलोत्पादन संचालक जीवन बुंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभियानांतर्गत शेतकऱ्यांसह विविध घटकांना विविध उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेची प्रमुख उद्दिष्टे:

१. शेतकरी व व्यावसायिकांसाठी उत्पन्न आणि रोजगार निर्मिती करणे.

२. मधुमक्षिकांच्या दर्जेदार केंद्रक साठ्यांचा (Nucleus Stock) विकास करणे.

३. मध आणि इतर पोळे उत्पादनांच्या परीक्षणासाठी अत्याधुनिक दर्जेदार प्रयोगशाळा स्थापन करणे.

४. डिजिटल ट्रॅकिंगसाठी 'ब्लॉक चेन' तंत्रज्ञानाचा विकास करणे.

मधाचे आरोग्यविषयक फायदे:

मध हा शरीराला तत्काळ ऊर्जा देणारा आणि प्रतिकारशक्ती वाढवणारा एक उत्तम नैसर्गिक अन्नघटक आहे. हा स्नायूंना बळकटी देतो तसेच सर्दी, खोकला, कफ व दमा या विकारांवर अत्यंत उपयुक्त असून, उत्तम अँटिबायोटिक आणि अँटिसप्टिक म्हणून कार्य करतो.

सहभागासाठी अटी व शर्ती :

·         दर्पन पोर्टल नोंदणी : राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाच्या (NBB) सर्व सदस्य संस्था, कंपन्या आणि महिला बचत गटांनी (SHGs) निती आयोगाच्या 'दर्पन पोर्टल'वर (Darpan Portal) नोंदणी करणे अनिवार्य आहे.

·         पात्रता निकष : अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडे किमान 3 वर्षांची NBB ची सदस्यता, नियमित वार्षिक वर्गणी भरल्याचा पुरावा, दर्पन पोर्टल नोंदणी आणि मधुमक्षिका पालनाचा प्रत्यक्ष अनुभव व पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. (ईशान्येकडील व हिमालयीन क्षेत्रांतील संस्थांसाठी ही अट 2 वर्षांची आहे, तर सरकारी आणि सहकारी संस्थांना या कालावधीच्या अटीतून सवलत देण्यात आली आहे.)

·         निधीची कमाल मर्यादा: NBB च्या कोणत्याही एका सदस्यास/संस्थेस एका वर्षात सर्व प्रकल्पांसाठी मिळून जास्तीत जास्त रु. 45.00 लाख पर्यंतचा निधी मिळू शकतो. (ही मर्यादा सरकारी संस्था, NAFED, NDDB इत्यादींना लागू नाही.)

अभियानांतर्गत समाविष्ट प्रमुख घटक:

·         लघु अभियान - I: दर्जेदार केंद्रकसाठा विकास केंद्रे, मधुमक्षिका प्रजनकांचा विकास, परीक्षण व रोग निदान प्रयोगशाळा, उपकरणांचे उत्पादन, महिलांचे सक्षमीकरण आणि तांत्रिक प्रात्यक्षिके.

·         लघु अभियान - II: मध व इतर पोळे उत्पादनांचे संकलन, व्यापार, विपणन, पॅकेजिंग, साठवणूक, शीतगृहे आणि प्रक्रिया युनिट्सची उभारणी किंवा नूतनीकरण.

·         लघु अभियान - III: विविध प्रदेशांनुसार योग्य संशोधन व विकास, नवीन तंत्रज्ञान निर्मिती आणि मूल्यवृद्धीसाठी संशोधन करणे.

अर्ज करण्याचे आवाहन : राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान (NBHM) अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 'महाडीबीटी' (Mahadbt) पोर्टलवर किंवा www.nbhm.gov.in / www.nbh.gov.in या संकेतस्थळावर 'फलोत्पादन' या घटकाखाली आपले अर्ज सादर करावेत.

योजनेच्या अधिक व सविस्तर माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी आयुक्तालय, पुण्याचे फलोत्पादन संचालक जीवन बुंदे यांनी कळविले आहे.

000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन