राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेत ‘डीएव्ही’च्या देव व ऊर्वीला पदक

 






ठाणे,दि.30(जिमाका) :- येथील डीएव्ही पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सुनिलकुमार देव सिंग याने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात रजत; तर मुलींच्या गटात ऊर्वी जगदीश मोरे हिने कांस्यपदक पटकविले. जिल्हास्तरीय आणि विभागीय निवड चाचणी स्पर्धेद्वारे या दोघांचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. 

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत देव आणि ऊर्वीने आपापल्या वयोगटात ट्रॅडिशनल, रिदमिक आणि आर्टिस्टिक प्रकारात प्रत्येकी तीन सुवर्ण पदके पटकविली होती. त्यानंतर वसई येथे झालेल्या मुंबई विभागीय शालेय योगासन स्पर्धेत देवने ट्रॅडिशनल आणि आर्टिस्टिक प्रकारात दोन सुर्वर्ण पदके प्राप्त केली होती; तर ऊर्वीने आर्टिस्टिक प्रकारात सुर्वण आणि ट्रॅडिशनल प्रकारात कांस्यपद पटकविले होते. त्यामुळे या दोघांची छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने घेण्यात आली होती.

ऊर्वीने आतापर्यंत विविध स्पर्धेत उत्तम यश संपादन केले आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे झालेल्या सीबीएससी राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेत तिने पाचवे स्थान पटकविले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोवा या चार राज्यांचा समावेश असलेल्या दक्षिण विभागीय निवड चाचणीत यशस्वी ठरल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. ही निवड चाचणी स्पर्धा कर्नाटकमधील जिंदालनगर येथे झाली होती. डीएव्ही संस्थेंतर्गत झालेल्या महाराष्ट्र आणि गुजरात विभागीय योगासन स्पर्धेतही ऊर्वीने सुवर्ण पदक पटकविले आहे. त्यामुळी तिची आता डीएव्ही संस्थेच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा जानेवारी 2026 मध्ये नोएडा (दिल्ली) येथे होणार आहे.

डीएव्ही पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सिम्मी जुनेजा यांनी ऊर्वी आणि देवचे अभिनंदन केले आहे. या दोघांना योग शिक्षक डॉ. अजय कुंभार यांच्यासह इतर विविध क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनीही या दोघांचे अभिनंदन केले आहे.

फोटो ओळी:

 छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेतील डीएव्ही पब्लिक स्कूलचा विद्यार्थी देव सुनिलकुमार सिंग याने रजत पदक; तर ऊर्वी जगदीश मोरे हिने कांस्यपदक पटकविले.

000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट