मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला लवकरच सुरुवात महाडीबीटी पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात
ठाणे,दि.22(जिमाका) :- ग्रामीण भागातील
अर्थव्यवस्थेला अधिक बळ देणारी आणि पारंपारिक पशुपालन व्यवसायाला उद्योजकतेचे आधुनिक
स्वरूप देणारी 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' संपूर्ण पारदर्शक पद्धतीने
राबविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. महाआयटीकडून सध्या 'महाडीबीटी' पोर्टलवर
अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी विशेष सुविधा निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, ते पूर्ण होताच इच्छुक लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने
अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.)
यांनी दिली आहे.
राज्यातील पशुसंवर्धन
व्यवसायाला एक नवीन दिशा देण्यासाठी आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात रोजगाराच्या मोठ्या
संधी निर्माण करण्यासाठी या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण
भागातील उद्योजकतेला चालना देणारी ही योजना राज्याच्या आर्थिक विकासात अत्यंत भरीव
योगदान देणारी ठरणार आहे. यामुळेच या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी राज्यातील
युवावर्गासह शेतकरी आणि पशुपालकांमध्ये सध्या प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत
आहे. या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, योजनेची संपूर्ण अंमलबजावणी वेळेवर आणि
अत्यंत पारदर्शकपणे व्हावी, यासाठी पशुसंवर्धन विभागाने सूक्ष्म नियोजन करण्यास सुरुवात
केली आहे.
इच्छुक लाभार्थ्यांना
कोणत्याही त्रासाशिवाय घरातूनच अगदी सहजपणे अर्ज करता यावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या
माध्यमातून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी महाआयटीच्या तांत्रिक
पथकाकडे विशेष पोर्टल निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली असून ते हे पोर्टल लवकरात
लवकर कार्यान्वित करण्यासाठी वेगाने काम करत आहेत. या पोर्टलचे काम पूर्ण होताच, योजना
अधिकृतपणे सुरू झाल्याची रीतसर सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत लवकरच प्रसिद्ध केली
जाईल, असे आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात
पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून (पुणे) एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार
'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने'विषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळवण्यासाठी,
मनात काही शंका असल्यास किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास इच्छुक लाभार्थ्यांनी
'१९६२' या टोल-फ्री
कॉल सेंटर क्रमांकावर थेट संपर्क साधावा. याशिवाय नागरिकांनी आपल्या परिसरातील नजीकच्या
पशुवैद्यकीय केंद्राला भेट देऊन तेथूनही आवश्यक ती माहिती मिळवावी, असे आवाहन पशुसंवर्धन
आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
0000000000
Comments
Post a Comment