सुक्ष्म सिंचन घटकाखाली अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार ९०% अनुदान
ठाणे,दि.30(जिमाका) :- ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक ही योजना
सन २०२६-२७ मध्ये राबविण्यात येत असून, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अनुसूचित
जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी अर्ज मागविण्यासाठी आवाहन करण्यात
येत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता
वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे तसेच आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचन क्षेत्रात वाढ करणे, जलवापर कार्यक्षमतेत वाढ
करणे कृषी उत्पादन व पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, कुशल व अकुशल बेरोजगारांसाठी
रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्यानुषंगाने,
ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जाणार
आहे. तरी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत.
शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना सर्व माहिती अत्यंत अचूक भरावी, अन्यथा अर्ज रद्द
होण्याची शक्यता असते. या पोर्टलवर 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावडे
अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करताना शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, ओळख
पडताळणीसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे अनिवार्य आहे.
या योजनेचा लाभ एका शेतकऱ्याला कमाल ५ हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित राहील.
सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक व तुषार संच उभारणीसाठी शासनाकडून अनुदान
दिले जाते राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प
भूधारकांना ५५% व इतर भूधारकांना ४५% अनुदान अदा करण्यात येते. तसेच अनुसूचित जाती
व अनुसुचित जमातीतील अल्प व अत्यल्प भुधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे २५ टक्के आणि इतर
शेतकऱ्यांना ३० टक्के पुरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून अदा करण्यात येत
असून उर्वरीत १०% ते १५% अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना / बिरसा
मुंडा कृषी क्रांती योजने मधून अदा करण्यात येते. असे एकूण अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना
८०% व इतर शेतकऱ्यांना ७५% अनुदान देण्यात येते व अनुसूचित जाती/जमाती शेतकऱ्यांना
९०% अनुदान देण्यात येते.
तरी अधिक माहितीसाठी तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत मदतीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या
परिसरातील सामूहिक सेवा केंद्र (सीएससी), सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ
कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा जास्तीत
जास्त लाभ गरजू शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे रामेश्वर
पाचे यांनी केले आहे.
000000000
Comments
Post a Comment