'एल निनो' आणि दुष्काळी परिस्थिती: सुपारी बागांचे शाश्वत व्यवस्थापन

 


 

 


सुपारी हे एक बारमाही पीक असून त्याला वर्षभर भरपूर पाणी आणि दमट हवामानाची आवश्यकता असते. अत्यधिक उष्णता आणि प्रखर सूर्यप्रकाश सुपारीच्या वाढीस व उत्पादनास बाधक ठरतो, ज्यामुळे विविध विकृती निर्माण होतात. अशा परिस्थितीत बागेस पाण्याचा ताण बसल्यास झाडांची आणि उत्पादनाची अपरिमित हानी होते. या पार्श्वभूमीवर, दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये सुपारी बागांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.

'एल निनो' आणि दुष्काळाचा सुपारी पिकावरील प्रभाव

पाण्याच्या तीव्र कमतरतेमुळे आणि अचानक वाढलेल्या तापमानामुळे सुपारीची फळगळ होण्याची दाट शक्यता असते. तसेच, नवीन येणारा तसेच पूर्वहंगामी फुलोरा आणि त्यातील नर-मादी फुले व कळ्या गळण्याचा धोका निर्माण होतो. प्रखर उन्हामुळे (विशेषतः नैऋत्य दिशेकडील उन्हामुळे) सुपारीच्या खोडाला भेगा पडून झाडे कमकुवत होतात. दीर्घकाळ पाण्याचा ताण राहिल्यानंतर बागेस अचानक पाणी पुरवठा झाल्यास किंवा जमिनीत पुरेशी आर्द्रता न राहिल्यास सुपारीचे टोक तडकून फळगळीची समस्या बळावते. एकदा सुपारीच्या बागेस पाण्याचा ताण बसल्यास, बाग पूर्वपदावर येऊन पूर्ववत् उत्पादन मिळण्यासाठी पुढील दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो.

दुष्काळकालीन जल व्यवस्थापन आणि उपाययोजना

सुपारी बागेतील पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर आणि पिकाची पाण्याची गरज प्रामुख्याने जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे हिवाळ्यात सहा ते आठ दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात चार ते पाच दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी देणे गरजेचे आहे. मोकाट पाणी देण्याची पारंपरिक पद्धत टाळून तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, ज्यामुळे पाण्याची मोठी बचत होते. पारंपरिक पद्धतीऐवजी तुषार सिंचन वापरल्यास 20 टक्के आणि ठिबक सिंचन वापरल्यास 44 टक्के पाण्याची बचत होते. ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येक सुपारीच्या झाडाला प्रतिदिवशी 20 लिटर पाणी देणे आवश्यक आहे. यासाठी ठिबकचा लॅटरल पाईप सुपारीच्या बुंध्यापासून 50 ते 60 सें.मी. अंतरावर गोलाकार फिरवून त्यावर तीन ते चार ड्रिपर बसवावेत, जेणेकरून मुळांना सर्व बाजूंनी नियमित पाणी मिळून जमिनीत ओलावा कायम राहील.

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याचे उपाय

जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सुपारीच्या ओळींमध्ये व झाडांच्या बुंध्याभोवती सुपारीची सुकलेली पाने (झावळ्या), केळीचे अवशेष, सुके गवत किंवा नारळाच्या सोड्यांचे आच्छादन करावे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवून पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारण्यासाठी प्रति झाड 10 ते 12 किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत वापरावे.

उन्हापासून खोडाचे संरक्षण आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन

तीव्र उन्हामुळे खोडाला इजा होऊन भेगा पडू नयेत म्हणून झाडाच्या खोडाला जमिनीपासून तीन ते चार फुटांपर्यंत बोर्डो मिश्रण किंवा चुना लावावा (व्हाइट-वॉशिंग). लहान व नाजूक झाडांच्या खोडाभोवती सुकलेल्या झावळ्या, हिरवे शेडनेट किंवा पेंढा गुंडाळून त्यांचे उन्हापासून रक्षण करावे. सुपारी तडकण्याची समस्या रोखण्यासाठी नियमित पाणी देण्यासोबतच दोन ग्रॅम बोरॅक्स प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीत ओलावा नसताना रासायनिक खतांचा वापर करणे पूर्णपणे टाळावे.

आंतरपिके आणि मिश्रपिकांचे महत्त्व

सुपारी बागेमध्ये सौम्य, दमट वातावरण राखण्यासाठी आणि पुरेसा गारवा व ओलावा टिकवून ठेवण्यासाठी केळी, अननस आणि मसाला पिकांची योग्य पद्धतीने लागवड करावी; पूर्वीची लागवड असल्यास तिची विशेष काळजी घ्यावी.

मार्गदर्शन व संपर्क

सदर माहिती विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांच्यामार्फत जारी करण्यात आली असून, अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी डॉ. किरण मालशे (दूरध्वनी: ९०२८२५८०२१ / ९४०५८५६०५६) यांच्याशी संपर्क साधावा.

 

 

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी

ठाणे/रायगड

0000000000

 

 

 

 

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती