‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार’ व ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम’ योजनांच्या अर्ज प्रक्रियेस 10 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 


ठाणे,दि.27(जिमाका) :-  राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ आणि ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ या दोन्ही योजनांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस दिनांक 10 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनांतर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास व भोजनासाठी थेट आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. यामध्ये ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेद्वारे’ इतर मागास प्रवर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना, तर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेद्वारे’ भटक्या जमाती-क (NT-C) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

व्यावसायिक महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज सादर करता आले नाहीत, अशा प्रथम वर्षाच्या (New 1st Year) विद्यार्थ्यांना देखील या योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने ही मुदतवाढ दिली आहे.

तरी, राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक 10 डिसेंबर 2026 पर्यंत आपले ऑनलाइन अर्ज विहित पद्धतीने सादर करावेत. तसेच संबंधित सर्व शैक्षणिक संस्थांनी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. सदर योजनांबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, कळवा, जिल्हा ठाणे येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000000000


Comments

Popular posts from this blog

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती